अडीच हजार नागरिक विशेष रेल्वेने उत्तर भारताकडे रवाना

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

नंदुरबार : सतत दुसऱ्या दिवशी प्रशासनातर्फे बिहारला जाण्यासाठी दोन विशेष रेल्वे गाड्यांची व्यवस्था करण्यात आली.

या गाड्यांनी अररिया येथे १२१० आणि पुर्णिया येथे १२९० नागरिक आपल्या गावाकडे रवाना झाले. कालप्रमाणेच आजही चोख पोलीस बंदोबस्तात सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, अविश्यांत पंडा, तहसीलदार भाऊसाहेब थोरात आदी उपस्थित होते.

रेल्वेने गेलेल्या नागरिकांत नवापूर, शहादा, येथील मजूर व अक्कलकुवाच्या जामिया संकुलातील आणि शहादा येथील एका संस्थेतील विद्यार्थ्यांचा समावेश होता.

सकाळपासून विविध वाहनाने या सर्वांना रेल्वे स्थानकात आणण्याची व्यवस्था करण्यात आली होती. दोन व्यक्तीत विशिष्ट अंतर ठेऊन त्यांना रेल्वे गाड्यात बसविण्यात आले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले होते.

पोलीस उपअधीक्षक रमेश पवार, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, पोलीस निरीक्षक सुनील नंदावळकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.जाफर तडवी आणि उप शिक्षणाधिकारी डॉ.युनूस पठाण यांनी रेल्वे स्थानक परिसरातले नियोजन उत्तमरितीने केले.

दोन्ही दिवस मिळून चार रेल्वे गाड्यांद्वारे आतापर्यंत ४५१४ नागरिकांना बिहारच्या विविध भागात पाठविण्यात आले आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासन व राज्य शासन बिहारच्या प्रशासनाशी सातत्याने संपर्कात होते.

जिल्ह्याच्या इतर भागात अडकलेल्या स्थलांतरित नागरिकांना त्यांच्या गावाकडे पाठविण्यासाठी प्रशासनातर्फे आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे.

अहमदनगर लाईव्ह 24