बोगस बियाणे, खते व कीटकनाशक कंपन्यावर कारवाई करा – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

भंडारा : शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा फायदा घेऊन काही कंपन्या  बोगस बियाणे देतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दरडोई उत्पन्नावर त्याचा परिणाम होऊन नुकसान सहन करावे लागते.

अशा बोगस बियाण्यांच्या कंपन्यांवर कृषी विभागाने  तात्काळ कारवाई करावी, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.

शेतकऱ्यांना योग्य उत्पादनक्षम बियाणे, खते व कीटकनाशके देऊन त्यांना मदत करण्याचे दायित्व कृषी विभागाचे आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, असे ते म्हणाले.

जिल्हा परिषद सभागृहात विधानसभा अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली खरीप पूर्व हंगाम आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.

खासदार सुनिल मेंढे,  आमदार राजु कारेमोरे, जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंद्रन, मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस, पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, सह संचालक कृषी आर. जे. भोसले यावेळी उपस्थित होते.

यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

शेतकऱ्यांनी एकच पीक वारंवार घेतल्यामुळे शेतीची सुपिकता नाहीशी होत आहे. पीक घेताना फेरबदल करणे गरजेचे आहे.

जमीनीच्या सुपिकतेसह शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल अशा पिकांची निवड कृषी विभागाने करावी व शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध करून द्यावे, असे त्यांनी सांगितले.

बोगस खते व बियाणांचा सुळसुळाट सुरु झाला आहे. यासाठी फक्त कृषी केंद्राच्या मालकावर कारवाई करुन चालणार नाही तर बोगस कंपनीचा तपास करुन त्यावर गुन्हे दाखल करा.

कोणत्याही कारणास्तव शेतकऱ्यांची फसगत होणार नाही याची काळजी घ्यावी, असे विधानसभा अध्यक्ष यांनी सांगितले. कृषी केंद्रांनी कमी दरात बोगस किटकनाशके देऊ नये अशा सूचना कृषी विभागांनी द्याव्यात.

पिकांच्या रोगावर किटकनाशक फवारताना घ्यावयाच्या काळजीबाबत माहिती देऊन शेतकऱ्यांमध्ये जागृती करावी.

बियाण्यांचा  फायदा न झाल्यास तक्रार करा, असे त्यात नमूद करावे. चुकीचे खते व कीटकनाशक दिल्यास कृषी केंद्रावर कारवाई करावी, असे त्यांनी सांगितले.

शेतजमिनीची उत्पादकता कशी वाढेल यावर कृषी विभागाने लक्ष द्यावे. शेतकऱ्यांनी घरचेच बियाणे वापरावे याबाबत समुपदेशन करावे. त्यामुळे बियाण्यांवरील शेतकऱ्यांचा खर्च वाचेल.

त्याबाबत मोहिम आताच सुरु करा. बोगस बियाणे व किटकनाशके, खत याबाबत कठोर पावले उचलून आळा घालण्यात यावा, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी धान पेरणी, पिकांच्या हंगामातील वाढ, महाबिज, बियाण्यांचा साठा, खतांचा  व किटकनाशकांचा साठा, दुबार पेरणी, शेतकऱ्यांच्या तक्रारी या बाबत माहिती दिली.

अहमदनगर लाईव्ह 24