अमरावती : कोरोना प्रतिबंधासाठी संचारबंदी असताना जिल्ह्यात काही प्रमाणात उद्योग-व्यवसाय मर्यादित वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे.
अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी व नागरिकांच्या सुविधांसाठी लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली आहे. मात्र, शिथिलता असली तरी ती मोकळीक नाही.
कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठीच्या नियमांचे काटेकोर पालन झाले पाहिजे. त्यासाठी सर्व यंत्रणांनी नियमांची कडक व काटेकोर अंमलबजावणी होण्यासाठी प्रयत्न करावे, असे निर्देश पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले.
आपला जिल्हा लवकरात लवकर ग्रीन झोनमध्ये येण्यासाठी कोरोनाचा अधिक ताकदीने मुकाबला करायचा आहे. नागरिकांनी शिस्त आणि संयम पाळून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
जे दुकानदार, नागरिक नियम पाळणार नाहीत व ज्या व्यक्ती बेजबाबदारपणे वागून इतरांचे आरोग्य धोक्यात आणतात, अशा व्यक्तींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.
पालकमंत्री श्रीमती ठाकूर पुढे म्हणाल्या, जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवा, तसेच महत्त्वाच्या गरजा यासाठी मर्यादित वेळेत दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.
मात्र, या वेळेत गर्दी होणार नाही आणि सुरक्षित अंतर राखले जाईल, हे काटेकोरपणे तपासले पाहिजे. या काळात जिल्ह्याच्या सीमा बंद राहतील.
जिल्ह्यात अडकलेल्या इतर ठिकाणच्या नागरिकांचे येणे-जाणे नियम पाळूनच करण्यात यावे. रुग्णांचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे, कोविड आणि नॉन कोविड रुग्ण या दोघांनाही योग्य आणि वेळेत उपचार मिळणे महत्त्वाचे आहे.
कंटेनमेंट क्षेत्राकडे अधिकाधिक लक्ष द्यावे. तपासणीची प्रक्रिया व्यापक करावी, असेही निर्देश त्यांनी दिले आहेत.
या काळात महापालिका, नगरपालिका आदी स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारीही मोठी आहे. प्रशासनाच्या सहकार्याने पथके स्थापन करून दुकानदारांकडून व नागरिकांकडून सर्व नियमांची अंमलबजावणी होते किंवा कसे,
याकडे काटेकोरपणे लक्ष पुरविणे गरजेचे आहे. कुणी बेजबाबदारपणे वागत असल्याचे आढळल्यास तत्काळ दंड वसूल करा. आवश्यक तिथे दंडात्मक कारवाई करा.
शेवटी हा समस्त नागरिकांच्या व सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न आहे. त्यामुळे कारवाई करताना हयगय करून चालणार नाही. शिस्त व दक्षता पाळली गेलीच पाहिजे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
मनरेगा कामांना अधिक गती द्या
जिल्ह्यात रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने मनरेगामधून कामे होत आहेत. नर्सरी, नाला सरळीकरण, गुरांचा गोठा, शोषखड्डे अशा व इतर विकासकामांना गती देण्यात आली आहे.
त्यामुळे जिल्ह्यात मजूर उपस्थिती ४५ हजारांपर्यंत पोहोचली आहे. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विविध भागात महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून कामे होत आहेत.
वैयक्तिक लाभाच्या तसेच सामूहिक विकासकामांना प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी ही योजना वरदान ठरत आहे.
सोशल डिस्टन्सिंग व इतर दक्षतांचे पालन करून अशी कामे अधिकाधिक राबवावी व रोजगारनिर्मितीला चालना द्यावी, असे निर्देशही पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी दिले.