नगर :- शहरात डासांचा उपद्रव व डेंग्यूसदृश आजाराचा ज्वर वाढला आहे. शहरातील आरोग्य धोक्यात असल्याने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी महापालिकेकडे केली जाते, परंतु डासांचे निर्मूलन करण्यात मनपाला अपयश आले आहे.
सभागृह नेते स्वप्नील शिंदे यांच्या परिवारातील दोन सदस्य डेंग्यूमुळे रुग्णालयात दाखल आहेत. सत्ताधाऱ्यांची ही अवस्था असेल, तर नागरिकांनी दाद कुणाकडे मागायची असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शहरातील कुष्ठधाम ते भिस्तबाग रोड, तसेच श्रमिकनगर कमानीसमोरच सभागृह नेते स्वप्नील शिंदे राहतात. त्यांचे भाऊ सचिन शिंदे, आई लक्ष्मी शिंदे यांना डेंग्यूसदृश आजार झाला आहे.
त्यांच्यावर साईदीप हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. शिंदे यांच्या घराच्या परिसरातही अस्वच्छता व घाणीचे साम्राज्य आहे. या भागात डासअळ्यांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत असल्याने डासांचाही उपद्रव या भागासह शहरात वाढला आहे.
काही दिवसांपूर्वीच वैदूवाडी भागातील एकाचा डेंग्यूसदृश आजाराने मृत्यू झाला होता. आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप करत शिंदे कुटुंबीयांसह वैदूवाडीतील नागरिकांनी महापालिकेवर मोर्चा आणला होता.
त्यावेळी नागरिकांनी निवेदनातून तक्रार केली होती. त्यानंतर महापालिकेने उपाययोजना हाती घेतल्या, पण त्याचा फारसा उपयोग झालेला नाही. आजही या भागात आरोग्य विभागाकडून डेंग्यूसह विविध आजारांच्या नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना केल्या जात नाहीत, असा आरोप करण्यात येत आहे.
सभागृह नेत्यांच्या कुटुंबीयांना डेंग्यूचा आजाराने ग्रासले असल्याने त्यांनी प्रशासनावर संताप व्यक्त केला. शहरासह देशभरात स्वच्छ भारत अभियान राबवले जाते.
आगामी कालावधीत स्वच्छता सर्वेक्षण, तसेच पाहणीसाठी पथकही नगरमध्ये दाखल होणार आहे. यापार्श्वभूमीवर तात्पुरत्या उपाययोजना केल्या जातात. परंतु शहर स्वच्छतेत सातत्य राहात नसल्याचेच वेळोवेळी समोर आले.