शिर्डी,दि.8: कोरोनाचा प्रादूर्भावा रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या राहाता आणि शिर्डी परिसरात नऊ वीट भट्टयांवर काम करणाऱ्या
उत्तर प्रदेश राज्यातील 1402 कामगार व त्यांचे कुटुंबीय यांना आज दुपारी साईनगर शिर्डी रेल्वेस्थानकावरुन विशेष रेल्वेने उत्तर प्रदेशातील लखीमपूर जिल्ह्याकडे रवाना करण्यात आले.
यामध्ये साकुरी येथील 437, राहाता येथील 218, पिंपळस येथील 98, पुणतांबा येथील 55, खडकेवाके येथील 29, वाळकी येथील 35, रुई येथील 67 आणि एकरुखे येथील 89 कामगारांचा समावेश आहे. जवळपासत सत्तावीस तासांच्या प्रवासानंतर ही रेल्वे लखीमपूर येथे पोहोचेल.
राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने विविध उपाययोजना केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरु आहे.
राज्याच्या विविध भागात अन्य राज्यातून आलेले कामगार, नागरिक,पर्यटक,विद्यार्थी आणि भाविक विविध ठिकाणी अडकून पडले होते.
या सर्वांना विहित प्रक्रिया पार पडून त्यांच्या गावी जाण्यासाठी व्यवस्था करण्याचे शासनाने आदेशित केल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी संबधित तहसिलदार तथा आपत्ती व्यवस्थापन कायदा,2005 अन्वये घटना व्यवस्थापक यांना प्राधिकृत केले होते.
यासंबधीची विहित प्रक्रिया साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, साई संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे,
तहसीलदार कुंदन हिरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे, शिर्डी नगर पंचायतचे मुख्याधिकारी सतिश दिघे, गट विकास अधिकारी समर्थ शेवाळे, शिक्षणाधिकारी ज्ञानेश्वर वाकचौरे,
रेल्वे स्थानक व्यवस्थापक बी.एस.प्रसाद, साई संस्थान प्रसादालयाचे मुख्य व्यवस्थापक विष्णु थोरात तसेच तालुका प्रशासनातील अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने पार पाडून संबधितांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी रेल्वेची व्यवस्था करण्यात आली.
पोलीस निरिक्षक नितीन गोकावे, दीपक गंधाले, मिथुन घुगे तसेच रेल्वे प्रोटेक्शन फोर्सचे रामजी मीना,अनुप देशमुख यांनी आवश्यक पोलीस बंदोबस्त यावेळी ठेवला होता.
लॉकडाऊनमुळे शिर्डी येथे अडकून पडलेल्या जवळपास 1251 कामगारांना यापूर्वीच त्यांच्या मूळ गावी रेल्वेने पाठविण्यात आले आहे. आज 1402 कामगार व त्यांच्या कुटुंबीय उत्तर प्रदेशातील लखीमपूरकडे रेल्वेने मार्गस्थ झाले.
सर्व प्रवाशांना यावेळी प्रशासनाच्यावतीने भोजनाचे पॅकेटस, पाणी, प्रवरा मेडीकल ट्रस्टच्यावतीने मास्क पुरविण्यात आले. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वेस्टेशनवर पुरेशा औषधांसह वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले होते.
या पथकाने संबधितांची आरोग्यविषयक तपासणी केली. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन या सर्वांची रेल्वे डब्यात बसायची व्यवस्था करण्यात आली होती.
स्वगृही परत जाण्याचा आनंद सर्व कामगारांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. लॉकडाऊनसारख्या अडचणीच्याप्रसंगी तालुका प्रशासनाने आत्मीयतेने केलेल्या सहकार्यामुळे तसेच उपलब्ध करुन दिलेल्या सोयी सुविधांमुळे अडकून पडलेल्या
परराज्यातील मजूरांना त्यांच्या मूळ गावी जाणे शक्य झाले असून, त्यासाठी महाराष्ट्र शासनाचे मनापासून आभारी आहोत, अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.
औरंगाबादजवळील रेल्वे दुर्घटनेतील मृत्युमुखी पडलेल्यांना श्रध्दांजली
औरंगाबाद-जालना दरम्यान काल झालेल्या रेल्वे अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांना यावेळी सर्वांच्या वतीने श्रध्दांजली वाहण्यात आली.