भंडारा,दि. 8 :-महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांच्या मार्गदर्शनाखाली लॉकडाऊन काळात आर्थिक आधार म्हणून
जिल्ह्यातील 50 हजार 339 मजुरांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे. विशेष म्हणजे यात जिल्ह्यातील 541 ग्रामपंचायतींचा सहभाग असून त्यापैकी 404 ग्रामपंचायतींमध्ये कामे सुरु आहे.
लॉकडाऊन काळातही मजुरांना रोजगार मिळत आहे. मनरेगा अंतर्गत रोजगार हमी योजनेची कामे दरवर्षी सुरु होतात. मात्र लॉकडाऊनच्या काळातही जिल्हा प्रशासनाने मजुरांना रोजगार देण्यात यशस्वी नियोजन केले आहे.
जिल्ह्यात भंडारा – 55, लाखांदूर-44, लाखनी-62, मोहाडी-61 पवनी-63 साकोली 50 व तुमसर 69 ग्रामपंचायतींनी रोजगार हमी योजनेची कामे सुरु केली आहेत.
यात 2118 मस्टरवर या सर्व मजुरांची नोंदणी करण्यात आली आहे. तसेच 2513 मजुरांना युआयडी अंतर्गत नोंदणी झालेली आहे.
रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात सद्यस्थितीत 50 हजार 339 मजुरांना कामे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
आकडेवारीनुसार भंडारा तालुका -3468 मंजूर, लाखांदूर-10,013, लाखनी- 7451, मोहाडी- 8124, पवनी- 9605, साकोली- 7280 व तुमसर तालुक्यात 4398 मजुरांना कामे मिळाली आहेत.
महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मनुष्यदिन निर्मितीत भंडारा जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे, असे जिल्हा परिषद मग्रारोहयोचे उप जिल्हा कार्यक्रम समन्वयक गुणवंत खोब्रागडे यांनी सांगितले.