अमरावती, दि. 8 : चांगापूर, कामुंजा येथील सहकारी जिनिंग प्रेसिंग संस्थेच्या खरेदी प्रक्रियेतील अडचणी दूर करून तिथे कापूस खरेदी तत्काळ सुरु करण्याचे निर्देश राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री व जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले होते.
त्यानुसार प्रशासन व पणन महासंघाकडून हालचाली होऊन सोमवारपासून (11 मे) ही खरेदी सुरु होणार आहे. त्यामुळे भातकुली, तिवसा, अमरावती तालुक्यातील शेकडो कापूस उत्पादक शेतकरी बांधवांचा कापूस विक्रीतील अडथळा दूर झाला आहे.
चांगापूर व कामुंजा येथील कापूस खरेदी बंद असल्याची माहिती मिळताच पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी तत्काळ संबंधितांशी चर्चा केली व ही खरेदी प्रक्रिया तात्काळ सुरु करण्याचे निर्देश दिले. राज्य पणन महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव आदी यावेळी उपस्थित होते.
जिल्ह्यात कापूस उत्पादकांची संख्या मोठी आहे. सध्या कोरोना संकट व संचारबंदीमुळे आधीच शेतकरी बांधव अडचणीत आहेत. त्यामुळे प्राधान्याने हा प्रश्न सोडविण्याचे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले.
संचारबंदीमुळे मजूर मिळण्यात अडचणी येत असल्याने चांगापूर व कामुंजा येथील कापूस खरेदी बंद झाली होती. हा प्रश्न अत्यंत गंभीर असून, त्यामुळे तिवसा, भातकुली, अमरावती तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे.
त्यामुळे तत्काळ हालचालीचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. त्या अनुषंगाने सहकार विभाग व पणन महासंघाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चाही करण्यात आली.
त्यानुसार मजूर उपलब्धता व इतर अडचणींचे निराकरण करण्यात येऊन सोमवारपासून चांगापूर व कामुंजा या दोन्ही ठिकाणची कापूस खरेदी सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
जिल्ह्यात एकूण आठ कापूस खरेदी केंद्रे आहेत. त्यातील एक सीसीएचे असून, ते धामणगाव रेल्वे येथे आहे. उर्वरित केंद्रे सात पणन महासंघाची आहेत. कापसाचा हमीभाव 5 हजार 500 रूपये आहे.
आतापर्यंत 17 हजार 190 शेतकरी बांधवांकडून 4 लाख 65 हजार क्विंटल कापूस खरेदी झाली आहे. कापूस खरेदी प्रक्रियेत सोशल डिस्टन्स, मास्क आदी दक्षतेचे पालन झालेच पाहिजे. मात्र, दक्षता पाळताना कामाच्या वेगही कायम ठेवावा लागेल.
सर्वांची सुरक्षितता जपून प्रत्येक कार्यवाही करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
कुठल्याही अडचणी आल्या तर तात्काळ निदर्शनास आणून द्यावे. कोणत्याही परिस्थितीत शेतकरी बांधवांची गैरसोय होता कामा नये. त्यासाठी नियोजनपूर्वक कामे करावीत, असेही निर्देश त्यांनी दिले.