राज्यात परिवर्तन घडवण्याचे आवाहन

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

पारनेर :- गेल्या पाच वर्षांत राज्याचा कारभार अशा लोकांच्या हाती आहे, ज्यांच्याकडून शेतकरी, कष्टकरी, कामगार, उद्योजक, दलित, ओबीसी, तसेच आया-बहिणींच्या हितासाठी सत्तेचा वापर केला गेला नाही.

त्यामुळे या निवडणुकीस आम्ही विशेष महत्त्व दिले असून त्यातून मार्ग काढण्यासाठी राज्यात परिवर्तन घडवण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी केले.

राष्ट्रवादीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारार्थ शहरातील बाजारतळावर झालेल्या सभेत पवार बोलत होते. विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे अध्यक्षस्थानी होते.

शेतकऱ्यांना आत्महत्येच्या वाटेवर नेणारे मत मागण्यासाठी आल्यावर त्यांना दारात उभे करून नका. त्यांची ती लायकी नसल्याचे सांगत एकीकडे शे-पाचशे धनिकांची ७८ हजार कोटींची थकबाकी भरणारे सरकार कर्जाच्या वसुलीसाठी शेतकऱ्यांच्या घरातील भांडी बाहेर काढत असल्याची टीका करून पवार म्हणाले, भाजप-सेनेवाल्यांना शेतीविषयी आस्था नाही.

शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी होण्याची त्यांची तयारी नाही. दोन पैसे मिळू लागताच सत्ताधाऱ्यांनी कांद्याची निर्यात बंद केली. हे त्यांचे शेतकऱ्यांप्रती प्रेम आहे. सरकारने कर्जमाफीची घोषणा केली, प्रत्यक्षात मात्र केवळ ३१ टक्के शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला.

उर्वरित ६९ टक्के शेतकरी अजूनही कर्जाच्या ओझ्याखाली आहेत. त्यामुळेच महाराष्ट्रात तब्बल १६ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत, असे सांगत आम्ही सत्तेत असताना सरसकट ७१ हजार कोटींची कर्जमाफी केल्याची आठवण पवार यांनी करून दिली.

लंके यांनी तालुक्याला पाणी मिळवून देण्याचे वचन जनतेला दिले आहे. त्याची पूर्तता करण्यासाठी मी व माझे सहकारी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे पवार यांनी सांगितले. प्रत्यक्ष गरिबांत काम करणारा कार्यकर्ता मोठा केला पाहिजे. त्यामुळेेच लंके यांना उमेदवारी देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

अहमदनगर लाईव्ह 24