राहुरी :- विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी मतदार संघात भेटी – गाठी तसेच प्रचार दौरा सुरू करुन त्यात तालुक्यातील प्रश्नांवर उजेड टाकतानाच विकासावर भर देवून त्याबाबत मतदारांना जागृत करत असल्याने त्यांच्या सभांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.
तनपुरेंनी काल देसवंडी, तमनर आखाडा, गोटुंबे आखाडा, उंबरे, ब्राम्हणी आदी ठिकाणच्या गावात जावून बैठका घेतल्या. या बैठकांमध्ये तालुक्याच्या विकासासंदर्भात त्यांनी भूमिका विषद केली. यावेळी बोलताना प्राजक्त तनपुरे म्हणाले, यंदाच्या निवडणुकीत तरुणांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात मिळत आहे. मतदार संघातील पिण्याच्या पाणी योजना वारंवार बंद पडत आहेत.
त्यासाठी ठोस उपाययोजना नाही. त्यामुळे पाणी योजना असून महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. भंडारदरा धरणातून तालुक्यातील राहुरी तालुक्याच्या वाटायचे हक्काचे पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. मुळा धरण असून नसल्या सारखे झाले आहे. जायकवाडीला पाणी जात असल्याने सिंचनाची आवर्तने कमी झाले आहेत.
मागील वर्षी मुळा धरण २१ टीएमसी भरले. परंतु, ऐन दुष्काळात अवघे एक आवर्तन मिळाले. त्यामुळे, शेतीव्यवसाय उध्वस्त झाला आहे. मुळा धरणातून बीड साठी तीन टीएमसी जलवाहिनीतून पाणी नेण्याची योजना शासनासमोर आहे. समन्यायी पाणीवाटपाचा अनुसार जायकवाडीला दिल्या जाणाऱ्या पाण्यातून बीड साठी पाणी देणे अपेक्षित आहे.
परंतु, राहुरीचे लोकप्रतिनिधी या प्रश्नावर बोलत नाहीत. बीडच्या नेत्यांसमोर विरोध करण्याची लोकप्रतिनिधींची हिम्मत नाही. त्यामुळे राहुरी, नगर, नेवासा, पाथर्डी तालुक्याला पाणी मिळणे अशक्य होईल. मुळातून बीडला पाणी देण्यास विरोध करण्यासाठी विधानसभेत आवाज बलंद करण्यासाठी परिवर्तन करणे काळाची गरज झाली आहे.
राहुरीचे ग्रामीण रुग्णालयाची इमारत, तहसील कार्यालयाची इमारत, पोलीस कर्मचारी वसाहत, राहुरी लघु औद्योगिक वसाहतीमधील पाणी व रस्त्यांचे प्रश्न औद्योगीकरण, बेरोजगारांच्या हाताला काम असे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्रधान्य देऊ. निळवंडेच्या कालव्याची ० ते६६ किलोमीटरची कामे सुरू नाही. राहुरी तालुक्यात कणगर भागात काम सुरू करुन, जनतेला भुलविण्याचे काम सुरू आहे.
निळवंडी चे काम सुरू करण्यासाठी कृती समितीने रस्त्यावर आंदोलने केली. औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाच्या आदेशामुळे शासनाना काम सुरू करावे लागले. निळवंडे कृती समितीच्या संघर्षाचे हे यश आहे. परंतु, लोकप्रतिनिधी त्याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत आहेत. निळवच्या प्रश्नावर लोकप्रतिनिधींनी एकदाही विधानसभेत आवाज उठवलेला नाही.
दसऱ्याच्या कामाची व श्रेय घेण्यासाठी कार्यसम्राट समजणारे लोकप्रतिनिधी प्रत्यक्षात फोटोसम्राट आहेत. राहुरी मतदार संघाच्या अस्तित्वाची व स्वाभिमानाची ही लढाई आहे. लोकशाही मार्गाने निष्क्रिय लोकप्रतिनिधीला घरचा रस्ता दाखवण्याची योग्य वेळ आली आहे. जनतेने घड्याळ चिन्हावर मतदान करून परिवर्तन करावे. असे आवाहन तनपुरे यांनी केले.