हिंसक विचार थांबविण्यासाठी विचार प्रक्रिया बदलावी लागेल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

मुंबई, दि.9: हिंसक विचार थांबवायचा असेल तर जीवनशैली आणि विचार करण्याची प्रक्रिया बदलण्याची गरज आहे.

दुसऱ्याला मारलेली एक थप्पड ही इतरांचा सन्मान व प्रतिष्ठा राखण्याची आपली जबाबदारी विसरण्यास भाग पाडण्यास सुरुवात करते.

त्यामुळे रागावर नियंत्रण मिळवणे हेच कुटुंबात सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल असून त्यासाठी सकारात्मक विचारांना चालना देण्याची गरज आहे,

असे मत महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केले.

‘सहयोग ट्रस्ट’ आणि ‘मायग्रोथ झोन’द्वारे जनहितासाठी तयार केलेल्या ‘एक दीर्घ श्वास’ या प्रबोधन चित्रफितीचे झूम ॲपद्वारे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून प्रकाशन करताना त्या बोलत होत्या.

चित्रफितीच्या प्रभावी माध्यमातून कौटुंबिक हिंसाचार विरोधी संदेश खूप परिणामकारक पद्धतीने समाजातील सर्व स्तरांत पोहोचेल असेही ॲड. ठाकूर म्हणाल्या.

या ऑनलाइन कार्यक्रमात महिला बाल कल्याण आयुक्त हृषीकेश यशोद, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. असीम सरोदे, सागर विश्वास, सहयोग ट्रस्टच्या सचिव तसेच सामाजिक न्याय विश्लेषक ॲड.

रमा सरोदे, ॲड. स्मिता सिंगलकर राज्यातील सर्व 35 महिला व बाल विकास अधिकारी सहभागी झाले होते.

ॲड.रमा सरोदे म्हणाल्या, कोरोना काळात महिलांवरील हिंसा जगभरात वाढल्याचे पुढे आले. महिलांसाठी अनेक हेल्पलाईन आहेत व अनेक सुरू झाल्यात पण त्याचवेळी साधारणतः 57 टक्के स्त्रियांना भ्रमणध्वनीचा ॲक्सेस नाही असे लक्षात आले.

ज्यांच्या जवळ आधुनिक फोन आहेत आणि ज्यांच्याकडून हिंसा होऊ शकते त्यांच्यापर्यंत पोहोचणे हा प्रभावी उपाय ठरू शकतो. ‘एक दीर्घ श्वास’ हा राग आणि तणाव कसा दूर करता येईल यावरील मार्ग सांगणारा प्रबोधन व्हिडिओ आहे.

हिंसा होण्यापूर्वीच ती थांबवून कुटुंबातील व समाजातील वातावरण चांगले करता येईल असा विश्वास आम्ही प्रस्थापित करू इच्छितो.

‘मायग्रोथ झोन’चे सागर विश्वास म्हणाले की, अनेकदा आपल्याला राग येतो आणि राग आला की आपला प्रतिसाद हिंसक स्वरूपाचा होतो.

काही छोट्या छोट्या गोष्टी तंत्र म्हणून वापरून आपण आपल्या सवयी बदलू शकतो, आपला प्रतिसाद कसा असेल ते आपण निवडू शकतो.

आपल्या वागण्याचा पॅटर्न बदलायचा आहे असे ठरवून आपल्या वागणुकीवर लक्ष ठेवले तर केवळ कुटुंबात नाही तर नोकरीच्या, व्यवसायाच्या ठिकाणीसुद्धा आपण बदल घडवून आणू शकतो.

कुटुंबांतर्गत हिंसा थांबली तरच स्वस्थ आणि निरोगी समाज निर्माण होईल या भावनेतून या व्हिडिओ मध्ये अनेक रंगकर्मी व कलाकार दिलीप प्रभावळकर,

रोहिणी हत्तंगडी, गिरीश कुलकर्णी, प्रशांत दामले, सोनाली कुलकर्णी, राधिका आपटे, प्रतीक्षा लोणकर, मधुराणी गोखले प्रभुलकर, विभावरी देशपांडे, किशोर कदम, मुक्ता बर्वे, जयवंत वाडकर,

सोनाली कुलकर्णी ज्युनिअर, श्रुती मराठे, उमेश कामत, प्रिया बापट, अमृता खानविलकर, विजय पाटकर, सिद्धार्थ जाधव, क्षिती जोग, किरण यज्ञन्योपवित, अनिता दाते-केळकर, हृषीकेश जोशी, समीर पाटील,

स्पृहा जोशी, सायली संजीव, प्रसाद ओक, पर्ण पेठे, अमेय वाघ सहभागी झाल्याने हिंसेविरोधातील संदेश प्रभावीपणे पोहोचतो अशी भावना व्यक्त करण्यात आली.

अनेक व्हिडिओमधून हिंसा थांबविण्यासाठी काय करू नये हे सांगितले जाते पण काय सकारात्मक कृती करून हिंसा थांबविता येते असा विचार या प्रबोधन व्हिडिओतून पुढे येतो,

असे सांगून ॲड. स्मिता सरोदे- सिंगलकर यांनी सर्वांचे आभार मानले.

अहमदनगर लाईव्ह 24