चंद्रपूर : नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर असणाऱ्या ऑटोचालक, रिक्षाचालक, केशकर्तनालय व लॉन्ड्री व्यवसायात काम करणाऱ्या बारा बलुतेदारातील नाभिक व धोबी समाजातील व्यावसायिकांना पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप केले.
जिल्ह्यातील ब्रह्मपुरी व सिंदेवाही येथील वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये शनिवारी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत हे वाटप करण्यात आले.
लॉकडाऊनच्या दीर्घ काळामध्ये नियमित व पारंपारिक व्यवसायाचा देखील खोळंबा झाला आहे. यामुळे रोजच्या व्यवसायावर पोट चालणाऱ्या नागरिकांचे देखील नियमित व्यवसाय बंद पडले आहे.
तर काहीजण अशा गंभीर परिस्थितीतही आजारी, गरजवंत लोकांसाठी घराबाहेर पडून सेवा देत आहेत. यामध्ये ऑटो चालक व रिक्षाचालकांचा प्रामुख्याने समावेश होतो.
यासर्व व्यावसायिकांच्या व्यथा लक्षात घेऊन पालकमंत्री वडेट्टीवार यांनी ब्रह्मपुरी व सिंदेवाही येथील ऑटोचालक, रिक्षाचालक,
केशकर्तनालय चालविणारे नाभिक समाजाचे, लॉन्ड्री चालवणारे व्यवसाय करणारे धोबी समाजाचे, गरजवंतांना गट निहाय स्वखर्चातून जीवनावश्यक वस्तूंच्या किट वाटप केल्या. सोबतच त्यांना हात खर्चासाठी ५०० रुपये रोख देण्यात आले.
जिल्ह्यामध्ये लॉकडाऊनचा काळ कमी व्हावा, जिल्हा अंतर्गत व्यवसाय सुरू व्हावे, शारीरिक दुरी राखून व्यवहार सुरू व्हावेत, यासाठी आपण प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
त्यामुळे पुढील काळात कोरोना आजाराचा प्रसार होणार नाही. यासाठी प्रत्येकाने काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
व्यक्तिगत स्तरावर ही मदत दिली जात असून शासनाच्या विविध योजना मार्फतही गरजू, गरीब व आवश्यक जनतेपर्यंत अन्नधान्यांचे वाटप केले जात आहे.
या सर्व योजनांचा लाभ घेण्याचे आवाहनही वडेट्टीवार यांनी यावेळी केले. ब्रह्मपुरीचे नगराध्यक्ष रेखाताई उराडे, सिंदेवाही नगराध्यक्ष आशाताई गंडाते, जि.प. सदस्य राजेश कांबळे, प्रमोद चिमुरकर, हेमराज तिडके,
रमाकांत लोदे, सीमाताई सहारे, प्रभाकर शेलोकार, बाळाभाऊ राऊत, सुनील उटलवार, स्वप्नील कावडे, नितीन उराडे आदींनी या वाटपाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला.