श्रीगोंदा विधानसभा मतदार संघातील सन १९६२ पासूनच्या १२ निवडणूकांचा इतिहास

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

एक मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. सन १९६२ मध्ये महाराष्ट्र विधान सभेची निवडणूक झाली. एकूण २६४ विधानसभा मतदार संघापैकी अनुसूचित जातीसाठी ३३ आणि अनुसुचित जमातीसाठी १४ मतदार संघ राखीव होते. अनुसूचित जातीच्या ३३ मतदार संघापैकी श्रीगोंदा हा विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव होता. १९६२, १९६७ आणि १९७२ च्या विधान सभेच्या निवडणुकीसाठी हा मतदार सघ १५ वर्षे राखीव होता. मूळ शेवगावचे  बाबुराव महादेव भारस्कर यांनी १९६२ व १९६७ साली काँग्रेसचे उमेदवार म्हणून  निवडणूक लढवून जिंकली आणि समाजकल्याण मंत्री झाले .काँग्रेस पक्षाने १९७२ साली  बाबुराव भारस्कर यांची उमेदवारी नाकारून कोळगावचे प्रभाकर भाऊराव शिंदे यांना उमेदवारी दिली. परंतु तालुक्यातील  काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी बाबुराव भारस्कर यांच्या प्रेमापोटी त्यांची अपक्ष उमेदवारी ठेवून त्यांना ४ हजार ६६१ मतांनी विजयी केले.

      तीन वेळा अनुसुचित जातीसाठी राखीव असणारा श्रीगोंदा विधानसभा मतदार संघ १९७८ च्या विधान सभेसाठी खुला ( Open ) झाला. श्रीगोंदे तालुक्याला पहिल्यांदा तालुक्यातील आमदार करण्याची संधी चालून आली. श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री. शिवाजीराव नारायणराव नागवडे  यांनी विधान सभेसाठी कॉंग्रेसची उमेदवारी दाखल केली. त्यांना तोडीस तोड असा उमेदवार श्रीगोंदे तालुक्यात नसल्याने जनता पक्षाने कोपरगावचे मोहनराव आबाजी गाढे यांना उचल उमेदवारी दिली. आणि शिवाजीराव नागवडे या स्वकीय उमेदवाराचा  निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला. शिवाजीराव नागवडे १३ हजार ४८ मतांनी विजयी झाले.

      १९७८ च्या विधानसभा निवडणुकीनंतर शरदचंद्र पवार यांनी पुलोद आघाडी स्थापन करून १८ जुलै १९७८ रोजी  मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. महाराष्ट्रातील कॉंग्रेसची सत्ता गेली. देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २५ जून १९७५ ते  मार्च १९७७ या कालावधीत  देशात आणीबाणी जाहीर केली होती. त्यामुळे त्यांच्या विरोधात सर्व विरोधक संघटीत झाले. त्यांनी जनता पक्ष स्थापन केला. इंदिरा गांधीच्या विरोधात मार्च १९७७ ची लोकसभा निवडणूक जनता पक्षाने लढविली व  ५४४ पैकी  २९९ जागा जिंकून  २४ मार्च १९७७ रोजी मोरारजी देसाई यांना पंतप्रधान केले. जनता पक्ष पांच वर्षाची सत्ता तीन वर्षात घालवून बसला. सन १९८० ची लोकसभा इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसने जिंकली. ५४४ पैकी ३५३ जागा जिंकून १४ जानेवारी १९८० रोजी इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या .बिगर काँग्रेसची राज्ये सरकारे बरखास्त करण्याचा त्यांनी सपाटा लावला. त्यात शरदचंद्र पवार यांचे महाराष्ट्रातील सरकार बरखास्त करून एप्रिल १९८० मध्ये महाराष्ट्र विधान सभेच्या निवडणुका जाहीर केल्या. त्यामुळे शिवाजीराव नागवडे यांना आमदारकीची २८ महिने लाभली.

      शिवाजीराव नागवडे  सुमारे अडीच वर्षे आमदार असतांना त्यांनी तालुक्यावर आणि श्रीगोंदा साखर कारखान्यावर जबरदस्त पकड निर्माण केली. कारखान्याचे संचालक मंडळ आणि तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते  शिवाजीराव नागवडे यांनी सांभाळले. गावोगाव शिवाजी बापूंचे प्रस्थ होते. प्रत्येक गावातील प्रमुख कार्यकर्ते शिवाजीराव नागवडे  यांच्या बरोबर असल्याने सर्वसामान्य जनतेकडे त्यांचे दुर्लक्ष झाले. सामान्य जनता शिवाजी बापूंपासून  दुरावलेली होती. मे १९८० मध्ये विधानसभा जाहीर झाली. त्यावेळी पंचायत समितीचे सभापती बापूसाहेब जामदार होते. ते १५ वर्षापासून त्या पदावर होते. शिवाजी बापूंच्यावर नाराज असणाऱ्या तरुणांनी ठरविलेकी  त्यांच्या विरोधात  बापूसाहेब जामदार चांगला लढा देऊ शकतील. जिराईत भाग त्यांच्या पाठीशी  भक्कमपणे उभा राहील. प्रदीर्घ सभापती असणारे बापूसाहेब  जामदार संपूर्ण तालुक्याच्या परिचयाचे होते. म्हणून दि. ५ मे १९८० रोजी  बबनराव पाचपुते सह आम्ही  आठ – दहा तरुण सभापतीच्या निवास स्थानावर चर्चा करण्यासाठी गेलो. बापूसाहेबांची भेट घेऊन त्यांना विधानसभेला उभे राहण्याची विनंती केली. त्यांनीही तयारी दर्शवली.परंतु शिवाजीराव नागवडे यांनी काही संचालक हाताशी धरून बापुसाहेबांचे मन वळविण्यात यश मिळविले.

      बापूसाहेब जामदार  यांनी नकार दिल्यावर आम्ही बबनराव पाचपुते यांना शिवाजीराव नागवडे यांच्या विरोधात उभे करण्याची तयारी केली. “ गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर खाल्ली मोडून “  असे ठरवून आम्ही बबनराव पाचपुते यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. विद्यमान आमदार, जामदार, साखर कारखाना, तालुक्यातील सर्व सोसायट्यांचे चेअरमन, ग्रामपंचायतीचे सर्व सरपंच शिवाजीराव नागवडे यांच्या बरोबर होते. साखर विरुध्द भाकर अशी ही लढाई होती. नागवडे यांच्या साथीला जबरदस्त ताफा होता तर बबनराव पाचपुते यांच्या बरोबर जीवाभावाचे फाटके कार्यकर्ते होते. पदर भाकरी बांधून कार्यकर्ते तालुक्यात आणि कर्जत तालुक्यातील मिरजगाव गटाच्या २८ गावात बबनराव पाचपुते यांच्या प्रचारासाठी जीवाचे रान करून फिरत होते. केवळ दोन मोटार सायकलवर संबध मतदार संघाचा दौरा आम्ही  केला. प्रत्येक गावात आम्ही सभा घ्यायचो व सभा संपल्यानंतर  उन्हाच्या संरक्षणासाठी डोक्याला बांधलेली उपरणी ( बागाईतदर ) आम्ही लोकांपुढे अंथरून पेट्रोलसाठी मदतीची मागणी करायचो. रुपया , आठ आणे आमच्या उपरण्यावर  पडायचे. काही महिला आपल्या लुगड्याच्या वरुट्यांतील  पैसे काढून आम्हाला द्यायच्या. एका गावात वीस पंचवीस रुपये गोळा व्हायचे.त्यावेळी तीन रुपये लिटर पेट्रोल होते. या वर्गणीतून आमच्या पेट्रोलचे भागून पैसे उरत असत.

      त्यावेळी एक रूपक कथा आम्ही तयार केली होती. “ एक कोंबडी असते. ती अंड्यावर बसलेली असते. एक दिवस ती अंडी सोडून चरायला जाते व त्या अंड्यावर एक नाग येऊन बसतो. कोंबडी चरून परत आली आणि पहाते तो आपल्या अंड्यावर नाग बसलेला. ती हत्तीकडे जाते  आणि माझी अंडी नागापासून मोकळी  करण्याची विनंती करते.  हत्ती म्हणतो, “ आता येतो, एका फटकाऱ्यात त्या नागाला बाजूला करतो व तुझी  अंडी मोकळी करतो “ . कोंबडी म्हणाली, “ हत्ती दादा,  तुमची मदत माझ्या कामाची नाही. माझी अंडी फुटतील. नंतर कोबडी जाते  घोडयाकडे . त्याने सांगितले. त्या नागाला अशी एक टाप मारतो आणि अंडी मोकळी करतो. कोंबडीने हात जोडले, माझी अंडी फुटतील.तिने हत्ती, घोडा , उंट या सर्वांची मदत मागितली . परंतु या सर्व मोठ्या प्राण्यांची मदत कुचकामी ठरली. शेवटी कोंबडी गेली मुंग्यांकडे आणि त्यांना विनंती केली. मुंग्या म्हणाल्या, कोंबडीताई , कोंबडी ताई , काही काळजी करू नको. आम्ही आमची रांग , त्या नागापर्यंत नेऊन नागाला वेढा घालतो आणि कडकडून चावा घेतो व नागाला  पळवून लावून, अंडी मोकळी करतो. कोंबडीला हा सल्ला पटला. मुंग्यांचा मोर्चा नागाकडे वळला आणि  मुंग्यानी नाग पळून लावला. श्रीगोंदे तालुक्यातील  नाग हटविण्यासाठी सर्व मतदार मुंग्यांनी आता एकत्र येण्याची गरज  आहे. हत्ती, घोडे व उंट  यांच्या सारखे मोठे कार्यकर्ते काही कामाचे नाहीत. असे आम्ही सांगायचो आणि  लोक माना डोलायचे. आमची ही रूपक कथा श्रीगोंदा विधानसभा मतदार संघाला चांगलीच भावली आणि १५१९ मतांनी बबनराव पाचपुते  यांना लोकांनी विजयी केले.

      त्यावेळी पिंपळगाव पिसा येथील बाबासाहेब सरोदे यांनी महिला हे  चिन्ह घेऊन श्रीगोंदा विधानसभा मतदार संघाची निवडणूक लढविली. शिवाजीराव नागवडे यांचे काँग्रेसचे चिन्ह हाताचा पंजा हे होते.नागवडे हे इंदिरा गांधी यांच्या पक्षाचे उमेदवार असल्याने  अनेक मतदारांनी हाताचा पंजा आणि इंदिरा गांधी समजून महिला अशा दोन्ही  चिन्हावर मतदान केले .२ हजार ४१८ मते पंजा आणि महिला यांना पडल्याने ती बाद झाली, खर तर ते मतदान शिवाजीराव नागवडे यांचेच होते. महिला चिन्हावर १ हजार ६०० मते पडली. ती देखील अनेकांनी इदिरा गांधी समजून त्या चिन्हावर मतदान केले.सुमारे तीन हजार मते अडाणी मतदारांच्या फसगतीने  शिवाजीराव नागवडे यांच्या ऐवजी बाबासाहेब सरोदे यांना पडली. व त्यामुळे पाचपुते १ हजार ५१९ मतांनी विजयी झाले. पाचपुते यांच्या विजयाला बाबासाहेब सरोदे यांचा निश्चितच हातभार लागला.

      सन १९८० साली अर्स काँग्रेसच्या वतीने कुंडलिकराव जगताप यांनी निवडणूक लढविली या निवडणुकीच्या प्रचारासाठी २८ मे १९८० रोजी महाराष्ट्राचे  माजी  मुख्यमंत्री  श्री. शरदचंद्र पवार हे पिंपळगाव पिसा येथे कुंडलिकराव जगताप यांच्या प्रचारासाठी आले होते. त्यांना ११ हजार ५२ मते मिळून ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यांची उमेदवारी देखील बबनराव पाचपुते यांच्या पथ्यावर पडली.अन्यथा त्यांच्या ११ हजार मतांपैकी सुमारे ६० टक्के मते शिवाजीराव नागवडे यांना पडली असती तरी नागवडे निवडून आले असते . सन १९८० च्या निवडणुकीत बबनराव पाचपुते यांना उमेदवारी देण्यामध्ये कुमार सप्तर्षी आणि माजी खासदार  संभाजीराव काकडे यांचाही सिंहाचा वाटा होता म्हणून  पाचपुते यांच्या राजकीय उदयामध्ये त्यांचेही मोलाचे योगदान आहे.

      १९८५, १९९०, १९९५  या निवडणुका बबनराव पाचपुते यांनी जिंकल्या. सन १९९९ च्या निवडणुकीला बबनराव पाचपुते राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ घेऊन उभे राहिले. ऐनवेळी घन:शाम शेलार  यांनी  दि. २८ ऑगस्ट १९९९ रोजी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. या प्रवेशाची  मतदारांमध्ये उलटी प्रतिक्रिया  होऊन  पाचपुते यांचा  ८ हजार ७५ मतांनी  काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव नागवडे यांनी  पराभव केला. त्यानंतर शरद पवार यांनी १४ नोव्हेंबर १९९९  ते ३० एप्रिल २००३ अखेर त्यांना प्रदेशाध्यक्ष केले. पुढे २००४ साली पाचपुते यांना राष्ट्रवादीचे तिकीट मिळण्यास अडचण आली. आघाडीच्या विद्यमान आमदाराला उमेदवारी देण्याचे धोरण ठरले व त्यात शिवाजीराव नागवडे यांना काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीची उमेदवारी मिळाली. आंम्ही श्रीगोंदे तालुका विकास आघाडी स्थापन करून बबनराव पाचपुते यांना कुकरच्या चिन्हावर अपक्ष उभे केले व १९ हजार २८५ मतांनी विजयी केले.

      १६ ऑक्टोबर २००४ रोजी निकाल लागल्यावर आम्ही २५/३० कार्यकर्ते मुंबईला गेलो. दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व प्रमुखांच्या बंगल्यावर जाऊन आलो. परंतु एकाही प्रमुखाने आम्हाला साथ दिली नाही. सांयकाळी पांच वाजता सर्व कार्यकर्ते नाराज अवस्थेत बसले होते. काय पवित्रा घ्यायचा हे समजत नव्हते. अखेर मी शेवटचा उपाय सुचविला की, बबनराव पाचपुते यांनी दिल्लीला जावून  शरद पवार साहेबांना  भेटून यावे. बबनराव पाचपुते म्हाणाले, मी एकटा  कसा जाऊ ? त्यावर सर्व कार्यकर्त्यांनी मला त्यांच्याबरोबर दिल्लीला जाण्यासाठी आग्रह धरला. बाळासाहेब नाहाटा हे गुपचूप बाहेर पडले व रात्री ९.३० च्या  फ्लाईटची  आमची दोन तिकिटे घेऊन आले. आम्ही रात्री ११.३० वाजता दिल्लीला पोहोचलो. महाराष्ट्र सदनात  मुक्काम केला.

      दि. १८ ऑक्टोबर २००४ रोजी सकाळी ८ वाजता आम्ही शरदचंद्र पवार साहेब यांच्या दिल्लीतील  ६, जनपथ बंगल्यावर गेलो. आमच्या पुढे बीडच्या खासदार केशरकाकू नंबरला बसल्या होत्या. पवार साहेबांनी त्यांना अगोदर बोलविले व त्यांच्या नंतर आमचा नंबर लागला.  कुकर या चिन्हावर अपक्ष निवडणूक   लढविताना आम्ही शरद पवार साहेब आणि त्यांच्या राष्ट्रवादी पक्षावर जहरी  टीका केल्याचे कोणीतरी शरदचंद्र पवार साहेब आणि अजितदादा पवार यांना सांगितले होते. त्यामुळे पवार साहेब, आमच्यावर भडकले. आपल्याला दिलेला रिपोर्ट कोणी तरी खोटा दिला आहे. असे घडलेले नाही. राष्ट्रवादीचा तांत्रिक राजीनामा देताना आम्ही स्पष्ट लिहिले होतेकी, अपक्ष निवडून आल्यावर आम्ही तुमच्या बरोबरच राहणार आहोत. राष्ट्रवादीमध्ये पुन्हा दाखल होणार आहोत. अशा आशयाच्या  माझ्या खिशातील राजीनाम्याची प्रत मी शरदचंद्र पवार साहेबांना दाखविली. व सांगितले आम्हाला पुन्हा राष्ट्रवादीत यावयाचे असल्याने आम्ही तुमच्यावर आणि तुमच्या पक्षावर कशी काय टीका करू शकतो ?  पवार साहेबांना आमचा युक्तिवाद पटला व ते शांत झाले. त्यांच्या चेहऱ्यावरील हाव भाव बदलले. मी त्यांचे बारकाईने फेस रिडिंग केले.

      तेवढ्यात पवार साहेबांना फोन आला की, चंद्रशेखर यांना दिल्लीतील एका  रुग्णालयात दाखल केले आहे. साहेब  ताडकन उठले व गाडी बोलविली. गाडीत बसतांना बबनराव पाचपुते यांना म्हणाले, येता का ? मी हळूच त्यांना जा म्हणालो व गाडीत बसवून देऊन , मी ६ जनपथ येथे थांबलो. रुग्णालयात चंद्रशेखर यांनी बबनराव पाचपुते यांना ओळखले व पवार साहेबांकडे  त्यांची शिफारस केली.  रात्री आम्ही ९ च्या फ्लाईटने मुंबईला निघालो .रात्री ११ वाजता आम्ही मुंबईला पोहोचलो.. आम्ही सिद्धी विनायक गणपतीचे दर्शन घेतले. बबनराव पाचपुते पुन्हा  पुन्हा  विचारत होते, आपले नेमके काय होईल ?  मी ठामपणे सांगत होतो. तुमचा  कॅबिनेटमध्ये   निश्चित समावेश होईल. मी अजितदादा यांच्याकडे खडा टाकून पाहिला, ते म्हणाले मोठ्या साहेबांना भेटलात आता तुमच्या कामाला काय अडचण आहे.?  ११ नोव्हेंबर २००४ रोजी बबनराव पाचपुते यांचा  कॅबिनेटमध्ये   समावेश झाला व त्यांना वन खाते मिळाले.

      बबनराव पाचपुते यांनी १९८० पासून २०१४ पर्यंत विधानसभेच्या  आठ निवडणूका लढविल्या. छत्री,नांगरधारी शेतकरी, चक्र, हात, घड्याळ,  कुकर,  घड्याळ आणि कमळ  अशा विविध चिन्हावर निवडणूक लढविली.पैकी १९९९ आणि २०१४  च्या दोन विधानसभा निवडणुका वगळता सहा विधानसभा निवडणुका त्यांनी जिंकल्या.  पांच वर्षे वनमंत्री , ३ वर्षे  आदिवासी विकास मंत्री. साडे तीन वर्षे  राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष , तीन वर्षे गृह राज्यमंत्री पद  अशी पदे त्यांनी भूषविली.

      श्रीगोंदे तालुक्यातील मी स्वत: प्रा. तुकाराम दरेकर, भानुदास गायकवाड, बी. एल. पाचपुते, भानुदास सावंत, ज्ञानदेव राऊत, वाल्मिक शिंदे, डी. एम. भालेराव, साहेबराव शिंदे, रामचंद्र मांडे,  रावसाहेब काकडे, गणपतराव काकडे, अरुण पाचपुते, नाना बढे,  संपत आढाव, निवृत्ती मोटे,  तुकाराम वैद्य,अंकुश वाजे, बापूराव खोमणे, सुखदेव साबळे, शिवाजी शेलार, झुंबर जांभळे , शिवाजी मोरे, एन. आर. सरोदे, बाबासाहेब सरोदे, शंकरशेठ भंडारी, इमाम शेख, खंडू जठार, प्रकाश पटवा, सुरेश सुडगे, शहाजी वाकडे, हनुमान गिरमकर, गणपत परकाळे, आण्णासाहेब शेलार (अनगरे ), शिवलालशेठ मुनोत, डॉ. प्रभाकर जगदाळे, अशोक काळोखे, रामभाऊ शिंदे, तबाजी शिंदे, बबन मदने, डॉ. दत्तात्रय नागवडे, रामकृष्ण डोमाळे, तुकाराम परकाळे, भाऊसाहेब पानसरे, निकाशेठ कोहली, गोविंद हिरवे,  जी. के. लगड, झुंबर दरेकर, हौसराव  भोस,  दत्तात्रय दांगडे, कांतीशेठ भंडारी, भानुदास म्हस्के, पोपट भदे, ज्ञानदेव अलभर, राम बोबडे, कुदांडे गुरुजी, भिमराव नलगे, सखाराम जगताप, बादशहा काझी, भगवान वाळ्के,  हरिश्चंद्र धांडे, धोंडीबा तरटे,  अनिल शिंदे, डॉ.मधुकर बडवे ( मांडवगण ) , नारायण कसरे,  दिलीप गायकवाड, पोपट कोठारी, भालेराव इंगळे, रामचंद्र माळवदकर, तुकाराम गिलके   या कार्यकर्त्यांच्या निस्वार्थी साथीमुळे बबनराव पाचपुते यांचा श्रीगोंदे तालुक्यात राजकीय उदय झाला. त्यांच्या राजकीय जडण घडणीत यासर्व कार्यकर्त्यांच्या बरोबर  माझाही सिंहाचा वाटा आहे, हे संपूर्ण श्रीगोंदा तालुका देखील मान्य करीन

      सन २०१९ च्या विधान सभेच्या निवडणुकीसाठी  बबनराव पाचपुते यांना वातावरण चांगले आहे. ते मतदार संघाच्या सतत संर्कात आहेत. उलट पाचपुते विरोधक मतदार संघ सोडून मुंबईच्या वाऱ्या करीत आहेत. कधी भाजपच्या दारात तर कधी शिवसेनेच्या दारात उमेदवारीची याचना करीत आहेत.मतदारांना वाऱ्यावर सोडून ते मतलबी राजकारण करीत आहेत. या नेत्यांनी आघाडीची बिघाडी करून टाकली असून, सन २०१४ मध्ये आघाडी बरोबर असणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांना सुडबुद्धीची  वागणूक त्यांनी दिलेली आहे. बाळासाहेब गिरमकर, बाळासाहेब नाहटा, प्रा. तुकाराम दरेकर , दत्तात्रय पानसरे अशा तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांना आघाडीच्या नेत्यांनी त्रास दिलेला आहे. ही बाब राष्ट्रवादीच्या राज्यपातळीवरील अनेक नेत्यांच्या कानावर घालूनही उपयोग न झाल्याने आघाडी खिळखिळी झाली असून, नाईलाजाने आघाडीतील अनेक कार्यकर्ते भाजपात प्रवेश न करता डॉ. सुजय विखे यांच्या बरोबर राहिले  असून, विधान सभेलाही बबनराव पाचपुते यांचे काम करणार आहेत. ज्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना त्रास दिलेला आहे, त्यांना बबनराव पाचपुते यांनी जवळ केल्यास दुखावलेले कार्यकर्ते पाचपुते यांचे देखील काम करणार नाहीत.

      सर्व विरोधक पाचपुते यांच्या विरोधात एकवटले असतांना देखील सन २०१४ मध्ये पाचपुते यांचा फक्त १३ हजार ६३७ मतांनी पराभव झालेला आहे. ६ हजार ९०० मते जरी फिरली असती तरी पाचपुते निवडून आले असते. बबनराव पाचपुते यांनी आठ विधानसभा निवडणुका लढविल्या  पैकी सहा जिंकल्या आणि दोन निवडणुका ते हरले. सन १९९९ मध्ये पाचपुते आणि नागवडे यांच्यात सरळ लढत झाली होती. व पाचपुते यांना ४७ टक्के मते  मिळून ते पराभूत झाले होते. सन २०१४ च्या विधान सभा निवडणुकीत  पाचपुते आणि राहुल जगताप यांच्या मध्ये सरळ लढत होऊन पाचपुते पराभूत झाले. त्यांना ४६  टक्के मते पडली.आता बबनराव पाचपुते यांची भाजपची उमेदवारी निश्चित मानली जाते. व त्यांना वातावारानही चांगले आहे.

      गेली पाच वर्षे पाचपुते सतत लोकसंपर्कात  राहिलेले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सहवासात राहून त्यांनी तालुक्यातील विकासाची अनेक कामे मार्गी लावली आहेत. उलट विद्यमान आमदार राहुल जगताप यांना मिळालेल्या संधीचे सोने करता आले नाही. पांच वर्षे त्यांनी वाळूच्या धंद्यात डझनभर युवकांना घुसवून, त्यांच्या तंत्राने कारभार केला. जगताप यांच्या गाडीत पाच वर्षे  पाच-सहा लोकांपेक्षा सातवा नवीन माणूस कधी दिसला नाही. लोकांच्या सुखदुखात पाचपुते एवढा सहभाग जगताप यांनी  घेतला नाही. सतत नागवडे यांच्या दडपणाखाली जगताप यांनी काम केले व नागवडे यांनी दुखावलेले लोक जगताप यांच्या पासून  बाजूला गेले. नगरपालिकेत आमदारांना दोन नगरसेवकावर समाधान मानण्याची वेळ आली. प्रामाणिकपणे साथ देणाऱ्या कार्यकर्त्याच्या गावात त्यांनी विरोधकांना ताकद देण्याचे काम केले. त्याचा  परिणाम सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना भोगावा लागणार आहे. सन २०१४ मध्ये पाचपुते यांची जी अवस्था झाली, ती आता जगताप यांची होणार आहे.   

            

अहमदनगर लाईव्ह 24