शेतकऱ्यांच्या मुलांकडून खासदार डॉ. सुजय विखे यांच्या वक्तव्याचा निषेध

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

संगमनेर :- कर्जत-जामखेड मतदारसंघातील भाजपचे उमेदवार पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या प्रचारसभेत शुक्रवारी (४ ऑक्टोबर) सुजय विखे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. ‘पालकमंत्री साहेब, त्यांच्या सभेला (विरोधी उमेदवाराच्या) जाणाऱ्या लोकांची यादी काढा.

त्यांच्या खात्यातही मागील महिन्यात मोदींनी दोन हजार रुपये जमा केले आहेत. मोदींचे हे दोन हजार रुपये चालतात, मग त्यांचे कमळ का नको?

तुम्हाला कम‌ळ चालत नसेल तर ते पैसे परत करा, आम्हाला गरिबांच्या कल्याणासाठी तरी वापरता येतील,’ असे विखे म्हणाले होते. मात्र, त्यांच्या या वक्तव्याचा सर्वच स्तरांतून निषेध होत आहे.

विखेंच्या वक्तव्याचा निषेध म्हणून संगमनेर तालुक्यातील शेतकरी कुटुंबातील काही तरुणांनीही एकत्र येऊन विखे यांना दोन हजार रुपयांचा चेक स्पीड पोस्टाने पाठवला आहे.

‘कमळाला मत देणार नसाल, तर दोन हजार रुपये परत करा,’ अशा प्रकारचे विधान करून राज्यातील शेतकऱ्यांच्या मताची किंमत करीत विखे यांनी शेतकऱ्यांचा अपमान केला असल्याचेही या मुलांनी म्हटले आहे.

‘दोन हजारांत आपली किंमत करू पाहणारे सुजय यांचे वडील राधाकृष्ण विखे-पाटील, ज्यांच्यासाठी सुजय नैतिकता बाजूला ठेवून मतांचा जोगवा मागत आहेत ते राम शिंदे व त्यांच्या पक्षाला, म्हणजेच भाजपला मतदान करू नका,’ असे आवाहनही या तरुणांनी शेतकऱ्यांना केले आहे.


अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24