अहमदनगर: आमदारकीसाठी इच्छुक असणा-या सगळ्यांना शब्द द्या, पण कुणाला शब्द दिला ते दुस-याला सांगू नका. गत पन्नास वर्षे आम्ही हेच केले, असे विधान करत भाजपाचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी विखे घराण्याच्या राजकारणाचे रहस्यच बुधवारी नगर येथे उलगडले. विखे यांच्या या विधानाने व्यासपीठावरील उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.
नगर शहरात उद्धव ठाकरे यांच्या सभेत ते बोलत होते. नगर मतदारसंघातून शिवसेनेकडून यावेळी अनेकजण इच्छुक होते. मात्र अनिल राठोड यांना उमेदवारी मिळाली. तो धागा पकडत विखे राठोड यांना उद्देशून म्हणाले, ‘तुमचे आता वय झाले आहे. पण एवढी घ्या मारुन अन् रिटायर व्हा. म्हणजे बाकी लोकांचे नंबर लागतील. आमदार व्हायचे असेल तर जे इच्छुक आहेत.
त्या प्रत्येकाला पुढच्या आमदारकीचा शब्द द्या. फक्त कुणाला शब्द दिला हे इतरांना कळू देऊ नका. पन्नास वर्षे आम्ही हेच राजकारण करत आलो आहोत. तुम्ही आमच्या सानिध्यात या’ असे ते म्हणाले.