अहमदनगर :- अवघ्या सात दिवसांवर विधानसभेची निवडणुक येऊन ठेपली असताना आक्रमक कार्यकर्त्यांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार संग्राम जगताप अडचणीत आल्याचे दिसत आहे.
हुल्लड कार्यकर्ते, त्यामुळे पक्ष संघटनेतील कार्यकर्त्यांची वाढती नाराजी, हुल्लडबाजांच्या त्रासामुळे वैतागलेले काही नागरिक ही बाब आमदार संग्राम जगताप यांना विधानसभा निवडणुकीत चांगलीच डोकेदुखी ठरली आहे.
कार्यकर्तेही व्यवस्थितरीत्या प्रचार करीत नसल्याने आ. संग्राम जगताप यांना निवडणूक जड जात असल्याचे दिसून येत आहे. नगर शहर विधानसभा मतदारसंघातील यांचे कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत.
आ.संग्राम जगताप यांच्या आक्रमक कार्यकर्त्यांमुळेच माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला असून हुल्लड कार्यकर्त्यांच्या त्रासामुळे राष्ट्रवादी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष किरण काळे यांनी वंचित बहुजन आघाडी तर्फे निवडणुकीत उतरत आ.जगताप यांच्यासमोर आव्हान निर्माण केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील हे दोन महत्वाचे नेते आ.जगताप यांच्यासोबत नसल्याने आ.जगताप यांना ही निवडणूक अडचणीची ठरणार असल्याचे बोलले जाते.
हुल्लड कार्यकर्ते हे पक्षसंघटनेत जगताप यांची मोठी डोकेदुखी ठरले आहेत. आता याच कार्यकर्त्यांमुळे काही नागरिकांनाही त्रासाला सामोरे जावे लागल्याने त्यांचीही नाराजी वाढली आहे. त्याचा मोठा फटका लोकसभा निवडणुकीत आमदार संग्राम जगताप यांना मिळाला आहे.
या राजकीय परिस्थितीत आमदार संग्राम जगताप यांच्याकडून योग्य कार्यकर्त्यांना बळ दिले जात नसल्याने कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत. सरकार कार्यकर्त्यांमुळे जगताप यांची अस्वस्थता वाढली आहे. त्याचा मोठा फटका त्यांना निवडणुकीत बसण्याची चिन्हे आहेत.