कोपरगाव :- पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्याकडून माझ्या नावाचा निष्कारण घोष चालू आहे. झोपेतसुद्धा ते माझेच नाव घेत असतील, असे सांगत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोपरगाव येथील सभेत बोलताना भाजपच्या अनेक नेत्यांची खिल्ली उडवली.
राष्ट्रवादीचे उमेदवार आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ पवार आले होते. हा तरुण या भागाच्या विकासासाठी झटत आहे. अशा तरुणांची खरोखर देशाला गरज आहे. या भागातील प्रश्न सोडवण्यासाठी आपण सरकारला भाग पाडू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली.
सत्तेचा गैरवापर करुन विरोधकांना संपवण्याच्या हालचाली सुरु आहेत, परंतु अशा कारवायांमुळे आम्ही डगमगत नाही, असेही पवार म्हणाले. कश्मिरचा मुद्दा भाजपने प्रचारात आणल्याबद्दल त्यांनी टीका केली.
आशुतोष काळे यांनी शरद पवार यांचा शेतकऱ्यांचे कैवारी असा उल्लेख करुन आता परिवर्तन घडेल, असा विश्वास व्यक्त केला. आमदारांच्या चुकीच्या धोरणावर टीका करताना जसे सरकार तसे हे लोकप्रतिनिधी अशी कोपरखळी त्यांनी मारली.
शंकरराव काळे कारखान्याचे ज्येष्ठ संचालक माजी आमदार अशोक काळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, संदीप वर्पे, मंगेश पाटील, डॉ. अजेय गर्जे, चैताली काळे, पुष्पा काळे आदी यावेळी उपस्थित होते.