नगर :- शहर मतदारसंघातील प्रचार शिगेला पोहोचलेला असतानाच येथील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रतिस्पर्धी उमेदवार शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करून तसे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पोलिस अधीक्षकांना देण्यात आले, तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रचाररथावर हल्ला केला, असा आरोप शिवसेनेने केला आहे.
नगर शहर मतदारसंघ अतिसंवेदनशील म्हणून घोषित करावा, अशी मागणीदेखील शिवसेनेने केली. या आरोप-प्रत्यारोपांमुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले. एकीकडे प्रचाराला गती मिळाली आहे, तर दुसरीकडे आरोप-प्रत्यारोपांमुळे वातावरण दूषित झाले आहे.
कायदा व सुव्यवस्थेचा निर्माण होईल, असे प्रकारदेखील समोर येत आहेत. शिवसेनेच्या प्रचारासाठी मुंबईहून आलेल्या प्रचार रथावर काही अज्ञात व्यक्तींनी सोमवारी दुपारी हल्ला केला. नगर-मनमाड रस्त्यावरील सावेडीनाका परिसरात हा प्रकार घडला.
या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती. हा हल्ला राष्ट्रवादीने केला, असा आरोप सेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी पत्रकार परिषदेत केला. पत्रकार परिषद सुरू असतानाच राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांनी पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांना निवेदन दिले.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांनी हे निवेदन स्वीकारले. प्रतिस्पर्धी उमेदवार कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. दोन्ही पक्षांच्या या आरोप-प्रत्यारोपांमुळे शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. मनपा पोटनिवडणुकीत केडगावात दुहेरी हत्याकांड घडले होते.
त्यानंतर पोलिसांवर दगडफेक झाली, तसेच पोलिस अधीक्षक कार्यालयाची तोडफोडही झाली. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले. केडगाव हत्याकांडाचा मुद्दा प्रचारात पुढे येत आहे. त्यातच कायदा सुव्यवस्था निर्माण होईल, असे प्रकार होत आहेत. त्यामुळे प्रत्येक हालचाल व घडामोडींवर लक्ष ठेवावे लागेल.