अमरावती, दि. 9 : अमरावती विभागातील विविध जिल्ह्यांत अडकलेल्या उत्तर प्रदेशातील 1 हजार 239 कामगार बांधवांना स्वगृही पोहोचविण्यासाठी विशेष श्रमिक एक्सप्रेस आज अमरावती रेल्वे स्थानकावरून लखनौकडे रवाना झाली.
जिल्ह्यात अडकलेल्या इतरही नागरिकांना स्वगृही पोहोचविण्यासाठी नियोजन केले असून, सर्वांनी संयम ठेवावा. कुणीही पायी जाऊ नये, असे आवाहन पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी यावेळी केले.
अमरावती विभागात अडकलेल्या कामगार बांधवांना स्वगृही सोडण्यासाठी ही विशेष श्रमिक एक्स्प्रेस विनाथांबा लखनऊपर्यंत जाणार आहे. ही एक्स्प्रेस 24 डब्यांची असून, त्यातून 1 हजार 239 प्रवासी नागरिक रवाना झाले.
पालकमंत्री ॲड. ठाकूर, खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते ट्रेनला हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ करण्यात आले. विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यासह अनेक अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी प्रवाशांशी संवाद साधून शुभेच्छा दिल्या. सर्वांनी सोशल डिटन्स राखावे व मास्क वापरावा. स्वतः काळजी घेऊन इतरांनाही सुरक्षित करावे, असे आवाहन पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी केले.
जिल्ह्यात अडकलेल्या इतरही प्रवाश्यांना स्वगृही पोहोचविण्यासाठी प्रयत्न होत आहेत. गुजरातेत बडोदा येथे ट्रेन सोडण्याबाबत नियोजन होत आहे.
अडकलेल्या सर्व नागरिकांना स्वगृही पोहोचविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी सांगितले.
रेल्वे स्थानकावर प्रथमत: सर्व प्रवासी नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यांच्या भोजन, चहा, पाणी व इतर व्यवस्था करण्यात आली. त्यासाठी विविध स्वयंसेवी संस्थांनी योगदान दिले.
विभागातून ठिकठिकाणाहून आलेल्या प्रवाश्यांच्या चेहऱ्यावर घरी परतण्याचा आनंद दिसत होता. शासनाने आमची दखल घेऊन विशेष ट्रेनची व्यवस्था केली याबद्दल अनेकांनी कृतज्ञता व्यक्त केली.
ट्रेन सुटताच प्रवाश्यांनी एकच जल्लोष केला व भारतमाता की जय, जय महाराष्ट्र अशा घोषणा देत जोशाने हात हलवत सर्वांना निरोप दिला.
लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्याला सुरूवात होताच शासनाने विविध ठिकाणी अडकलेल्या नागरिकांच्या परतीचा मार्ग मोकळा केला आहे.
जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर आणि जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी इतर राज्यांचे सचिव, संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधला.
त्यानुसार स्थानिक प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील परराज्यात अडकून पडलेल्या कामगार, मजूरांना परत अमरावतीत यावयाचे असल्यास त्या ठिकाणाहून www.amravati.nic.in
या लिंकवर तसेच covid19.mhpolice.in या संकेतस्थळावर संबंधितांनी ऑनलाईन अर्ज सादर करावा. त्यानंतर येथील जिल्हा प्रशासनाद्वारे येण्याची परवानगी दिली जाते. जिल्ह्यात परत येणाऱ्याची तालुकास्तरीय समितीमार्फत वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना 14 दिवस गृह विलगीकरणात राहणे बंधनकारक आहे.
आपल्या जिल्ह्यातून इतर ठिकाणी जाण्यासाठीसुद्या हीच प्रक्रिया अवलंबली जाते.