विनायक मेटेंना धक्का

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

बीड : राष्ट्रवादीला रामराम ठोकून शिवसेनेत दाखल झालेल्या जयदत्त क्षीरसागर यांना सोमवारी (दि.३०) मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत एबी फॉर्म देण्यात आला. बीडची जागा सेनेकडे गेल्याने महायुतीतील मित्रपक्ष शिवसंग्रामचे अध्यक्ष आ. विनायक मेटे यांना मोठा धक्का बसला आहे.

बीड मतदारसंघात महायुतीतील मित्रपक्ष शिवसंग्रामचे संस्थापक आ. विनायक मेटे यांना गतवेळी अल्पशा मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. लोकसभा निवडणुकीत त्यांनी बीडमध्ये भाजपच्या विरोधात जाहीरपणे भूमिका घेतली होती. दरम्यान, पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याशी महायुतीत बीडची जागा शिवसंग्रामसाठी सोडवून घेण्यासाठी ते ईषेला पेटले होते.

रविवारी (दि.२९) शिवसंग्रामच्या समर्थकांनी क्षीरसागरांच्याच राजुरी गावातून नवगण गणपती मंदिराचे दर्शन घेऊन रॅली काढली होती. श्रीक्षेत्र नारायणगडावर नारळ वाढवून रणशिंग फुंकले होते. मात्र आधीच मुंबई मुक्कामी असलेल्या जयदत्त क्षीरसागर यांनी आपले वजन वापरून शिवसेनेची उमेदवारी पदरात पाडून घेत युतीतील इच्छुक स्पर्धकांना हादरा दिला. ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरे यांच्याकडून त्यांनी एबी फॉर्म स्वीकारला. युतीची घोषणा होण्याआधीच शिवसेनेने बीडची उमेदवारी मंत्री क्षीरसागरांना दिली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24