कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार यांनी विजय मिळवत या मतदारसंघावरील २५ वर्षांपासून भाजपची सत्ता संपुष्टात आणली. या निवडणुकीमध्ये पवार यांनी नगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मुख्यमंत्री फडणवीस यांचे विश्वासू शिलेदार राम शिंदे यांचा धक्कादायक पराभव केला. पवार यांच्या प्रचारात आणि विजयात महाआघाडी तर अग्रेसर होतीच. मात्र, यामध्ये सर्वात पुढे होत्या त्यांच्या मातुश्री तथा बारामती अॅग्रो अँड डेव्हलपमेंटच्या विश्वस्त सुनंदा पवार.
रोहित यांच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका त्यांच्या मातुश्री सुनंदा पवार यांचीच होती. सुनंदा पवार यांनी कर्जत आणि जामखेड या संयुक्त मतदारसंघात महाविद्यालयीन तरुणी आणि महिलासाठी बारामती अॅग्रोद्वारे मासिक पाळी आणि त्याकाळात होणारे दुष्परिणाम यासाठी प्रत्येक शाळा-महाविद्यालयात संवाद साधत एकरूपता मिळवली. याकाळात त्यांनी मोफत सॅनिटरी नॅपकिन वाटप केले. यासह त्यांनी शालेय तरुणी, कुटुंब वत्सल गृहिणी यांच्यासह प्रत्येक गावातील महिलांना रोजगार, आरोग्य तसेच स्वयंरोजगार यासाठी मार्गदर्शन करत बारामती अॅग्रो आणि शारदानगरी येथील उच्च शिक्षण संस्था सहल घडवली.
या सहलीच्या माध्यमातून त्यांनी महिलांवर्गामध्ये आत्मविश्वास निर्माण केला आणि त्यांच्या मनात पवार कुटुंबाविषयी स्नेह आणि विश्वास निर्माण करण्यात यश मिळवले. कर्जत आणि जामखेड तालुक्यातील गावात पाणीटंचाई निर्माण झाली होती. अशावेळी ज्या ठिकाणी शासकीय यंत्रणा कुचकामी ठरत होती, त्या दरम्यान रोहित पवार यांनी बारामती अॅग्रोद्वारे सुरू केलेले मोफत पाणीवाटपाचे टँकर महिलांसाठी जीवनदायी ठरला होता. दोन्ही तालुक्यांत महिलांसाठी आरोग्य शिबिर, होम मिनिस्टर कार्यक्रम, तरुणींकरिता नोकरी मार्गदर्शन मेळावा आदी सामाजिक कार्यक्रम त्यांनी हाती घेतले. त्यासाठी सुनंदा पवार मतदारसंघात वास्तव्यास होत्या. या सर्व कार्याचे नेतृत्व सुनंदा पवार स्वत: निभावत होत्या.
निवडणुकीच्या काळात सुनंदा पवार यांनी प्रत्येक महिलेच्या कुटुंबामध्ये जात रोहित यांच्यासाठी मतदानाचे आवाहन केले. याच स्नेह आणि प्रेमाचे रूपांतर महिला आणि तरुणींनी मतदानरुपी विश्वास पवार कुटुंबीयावर दाखवत रोहित यांना तब्बल ४३ हजारांच्या मोठ्या मताधिक्याने निवडून दिले. यासह दुसरीकडे दुष्काळी भागात असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वडील राजेंद्र पवार यांनी बारामती कृषी विज्ञानमार्फत शेतकरी सहल आयोजित करत त्याद्वारे कमी पाण्यात शेती कशी फुलवता येते यासह नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करत स्वत:चा विकास आणि प्रगती करण्यासाठी अभ्यास दौरा बारामती ठिकाणी घडवला.
दोन्ही तालुक्यांतील शेतकऱ्यांना मोफत प्रवास देत त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न राजेंद्र पवार यांनी निश्चित केला. एकीकडे शेतमालाला अल्प दर तसेच नापिकीमुळे शेतकरी आत्महत्या करत असताना ही शेतीविषयक सहल दोन्ही तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना नवसंजीवनी देणारा ठरला. यासह रोहित पवार यांनी तरुणाईमध्ये स्वत: मिसळत अल्पावधीतच आपली लोकप्रियता कमावण्यात कमालीचे यश मिळवले.
तसेच प्रत्येक मतदारांशी वैयक्तिक संपर्क ठेवत त्यांच्या सुख-दुःखाची विचारपूस करत आपुलकीचे नाते निर्माण केले. राम शिंदेसाठी पत्नी आशा शिंदे यांनी पूर्ण मतदारसंघ पछाडला. राम शिंदे यांचे आई-वडील सर्वसामान्य कुटुंबातील व वयस्कर आणि अशिक्षित असल्याने त्यांनी कधी प्रचारात अथवा निवडणुकीत प्रत्यक्ष भाग घेतला नाही.