नागपूर :- कारमधून फिरून घरफोड्या करणाऱ्या प्रेमीयुगुलाला मानकापूर पोलिसांनी अटक केली आहे. उच्चशिक्षित असलेल्या या युगुलाने यूट्यूबवरून घरफोडीचे प्रशिक्षण घेऊन घरातच सराव केला. यात प्रशिक्षित झाल्यानंतर हे दोघे रात्री कारमधून बाहेर पडून घरफोडी करायचे. त्यांनी शहरात किमान पाच ठिकाणी घरफोड्या केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.
शैलेश वसंता डुंभरे (वय २९) आणि प्रिया (वय २१) अशी आराेपींची नावे आहेत. शैलेशचे एमबीएपर्यंतचे शिक्षण झाले आहे. तो एका कंपनीत चांगल्या पदावर हाेता. त्याला झटपट श्रीमंत व्हायचे हाेते. त्यामुळे त्याने ही नोकरी सोडून दिली. प्रिया ही मूळ अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथील रहिवासी. ती शिक्षणासाठी नागपुरात आली होती. शहरातील प्रसिद्ध चित्रकला शिक्षण महाविद्यालयाची तृतीय वर्षाची विद्यार्थिनी आहे.
गोरेवाडा परिसरात चक्क एक बंगला भाड्याने घेऊन ते लिव्ह-इनमध्ये राहत हाेते. त्यांनी यू ट्युबवरून घरफोडीचे प्रशिक्षण घेतले, आपल्याच घरात सरावही केला नंतर बाहेर पडून चाेरी करायला सुरुवात केली. पहिली घरफोडी यशस्वी झाल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास वाढला. त्यानंतर त्यांनी नागपूर शहरात घरफोड्यांचा धडाका लावला. मात्र पाेलिसांनी पाळत ठेवून या दाेघांना पकडले.