पीकविमा कंपनीमुळे शेतकऱ्यांच्या डोळयांत पाणी!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

पावसाने शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असताना विमा कंपनी शेतकऱ्यांना कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगून वेठीस धरून शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे. विमा कंपनीची नेमणूक करताना शासनाने स्पष्ट सूचना न दिल्याने असे प्रकार घडत आहेत. विमा कंपनीवर शासनाचे नियंत्रण नसून वेळकाढूपणाचे धोरण अवलंबिले जात आहे, यामुळे राज़्यातील हजारो शेतकरी पीकविम्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

प्रधानमंत्री पीकविमा भरल्यानंतर नुकसानभरपाई मिळेल, या आशेने राज़्यातील शेतकरी पीकविमा काढतो. मात्र, नैसर्गिकरित्या नुकसान होऊनही संबधित विमा कंपनीकडून कागदपत्रांच्या नावाखाली शेतकऱ्यांची अडवणूक होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये विमा कंपन्यांबाबत संताप व्यक्त केला ज़ात आहे. शेवगाव तालुक्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी मोठया आर्थिक संकटात सापडला आहे.

नैसर्गिक आपत्तीत नुकसानभरपाई मिळेल, या आशेने हज़ारो शेतकऱ्यांनी जुलै महिन्यात प्रधानमंत्री पीकविमा काढला होता. मात्र, पीकविमा भरताना विमा कंपनीने व संबंधित कृषी विभागाने प्रत्यक्षात बांधावर येऊन नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करणे गरजेचे असताना शेतकऱ्यांचे आश्रू पुसण्याऐवजी शेतकऱ्यांच्या डोळयांत पाणी आणलं आहे. विम्याची रक्कम मिळण्यासाठी कागदपत्रांची वारंवार पूर्तता करताना शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आले आहेत.

पावसाने पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले असताना पुन्हा कागदपत्रे सादर करण्यास सांगण्यात आल्याने विमा कंपनीच्या अशा कारभाराला शेतकरी वैतागले असून, विमा कंपनीने शेतकऱ्यांचा विश्वास गमावला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24