राब.. राब.. राबून शेतात सेंद्री लाल कांद्याचे पीक घेतले, पण मान्सून हंगाम संपून गेल्यानंतरही पडत असलेल्या जोरदार पावसाने कांद्याचे पीक पूर्णपणे सडून गेले आहे. आता तुम्हीच सांगा शेतकऱ्यांनी जगायचं की मरायचं? अशा व्यथा संगमनेर तालुक्याच्या पठार भागावरील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी पाणावलेल्या डोळ्याच्या कडा पुसत मांडल्या.
सेंद्री लाल कांद्याचे आगार म्हणून पठार भागावरील पोखरी बाळेश्वर, तळेवाडी, सारोळे पठार, माळेगाव पठार, सावरगाव घुले, महालवाडी, जवळे बाळेश्वर, वरूडी पठार ढोरवाडी, डोळासणे, धादवडवाडी, नांदूर खंदरमाळ, बावपठार, मोरेवाडी आदी गावे ओळखली जात आहे. या भागातील सर्वसामान्य शेती ही पावसावरच अवलंबून आहे. त्यामुळे दरवर्षी शेतकरी सेंद्री लाल कांद्याची पेरणी करीत असतो, तर काही शेतकरी लागवड करीत असतात.
याचबरोबर भूईमूग, वटाणा ही सुद्धा खरिपाची पिके घेतली जात असतात, पण गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने पडलेला दुष्काळ, शेतमालाला बाजारभाव नाही. त्यामुळे शेतकरी अक्षरश: मेटाकुटीस आले आहे. आता जगायचे तरी कसे? असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला होता. तरीही अशा कठीण परिस्थितीत सर्वसामान्य शेतकऱ्यांनी हार मानली नाही. यावर्षी मोठ्या प्रमाणात सेंद्री लाल कांद्याचे पैसे होतील, अशी अपेक्षा कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली होती. या भागातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी लाल कांद्याची पेर केली तर काही शेतकऱ्यांनी लागवड केली. त्या अगोदर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात शेणखत, कोंबडी खत शेतांमध्ये टाकले होते. सुरुवातीला कांद्याचे पीक चांगले जोमात उतरले होते.
जास्त पाऊस झाल्याने काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याची वेळ आली होती. तीही शेतकऱ्यांनी केली होती. आता लाल कांद्याला चांगले बाजारभाव असल्याने यावर्षीची शेतकऱ्यांची दिवाळी ही अतिशय गोड होणार होती, असे वाटत होते. त्यामुळे शेतकरी आनंदी होता. मात्र, परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेला घास पूर्णपणे हिरावून नेला आहे. शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीच पाणी साचल्याने कांदाही सडून गेला आहे. तरीही अशा पावसात शेतकऱ्यांनी हार न मानता सेंद्री कांदा शेतातून काढला आहे, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. जास्त पाण्यामुळे कांदा सडून गेला आहे.
पोखरी बाळेश्वर गावांतर्गत असलेल्या तळेवाडी भागातील सर्वसामान्य कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे तर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांनी काढून ठेवलेला कांदा पूर्णपणे भिजून गेला असून, काही ठिकाणी शेतांमधून पाणी वाहत आहे. सोन्यासारख्या कांद्याचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी डोक्यालाच हात लावला आहे. अनेकांना अश्रूही अनावर झाले होते. साहेब! राब… राब शेतात राबून सेंद्री लाल कांद्याचे पीक घेतले होते.
बाजारभावही चांगले असल्याने यावर्षीची दिवाळी गोड होवून दोन पैसेही मिळतील, अशी अपेक्षा आम्हाला होती. मात्र, परतीच्या पावसाने आमची पूर्णपणे वाट लावली आहे. आता तुम्हीच सांगा, आम्ही शेतकऱ्यांनी जगावं की मरावं, अशी दयनिय अवस्था आमची झाली आहे. कारण आता आम्ही पूर्णपणे कर्जबाजारी झालो आहोत, असे असताना देखील शेतकऱ्यांचे मात्र कोणालाच काही देणे घेणे नाही, अशा व्यथाही कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मांडल्या आहेत .