मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावरच काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. अंतर्गत गट-तटांच्या राजकारणाला कंटाळून लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या स्टार उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
उर्मिलांच्या राजीनाम्यावरून मिलिंद देवरा आणि संजय निरुपम यांच्यात आता जुंपली आहे. देवरा यांनी ट्विट करून उर्मिला मातोंडकर यांनी योग्यच गोष्टी मांडल्या आहेत, असे म्हणत निरुपमांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.
बॉलीवूड स्टार उर्मिला मातोंडकर यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तत्कालिन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचीही त्यांनी भेट घेतली होती. लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी उत्तर मुंबई मतदारसंघातून भाजपाच्या गोपाळ शेट्टी यांच्याविरोधात लढत दिली होती.
प्रचारादरम्यान त्यांनी चांगलीच हवा निर्माण केली होती. आपण केवळ निवडणुकांपुरते पक्षात आलेलो नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. उर्मिला यांच्या रूपाने काँग्रेसला एक वलयांकित मराठी चेहरा मिळाला होता.
मात्र उर्मिला यांची काँग्रेसच्या हाताबरोबरची साथ केवळ सहा महिनेच टिकली. आपण १६ मे रोजी तत्कालिन मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा यांना पत्र लिहिले होते. त्या पत्रात लिहिलेल्या बाबींवर कारवाई तर झाली नाहीच, पण ते गोपनीय पत्र प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचले.
ज्यांच्याविरोधात तक्रारी केल्या त्यांनाच आता पक्षात चांगली पदे मिळाली. कोणी माझा वापर करू नये यासाठी आपण पक्षाचा राजीनामा देत असल्याचे उर्मिला यांनी स्पष्ट केले आहे. निवडणूक प्रचाराच्या वेळी आपल्याला काँग्रेसच्या नेत्यांची साथ मिळत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. तेव्हाच त्या नाराज असल्याचे स्पष्ट झाले होते.
इतर कोणत्या राजकीय पक्षात प्रवेश करणार की नाही, हे मात्र त्यांनी स्पष्ट केले नाही. मात्र उर्मिलांच्या राजीनाम्यावरून आता काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीच चव्हाट्यावर आली आहे. मिलिंद देवरा यांनी संजय निरुपम यांच्यावर निशाणा साधला आहे.