राज्यातील चारही कृषि विद्यापीठ परीक्षा नियोजनाचा कृती आराखडा जाहीर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

मुंबई, दि.१२: राज्यातील कृषि व संलग्न अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी चारही कृषि विद्यापीठातील परीक्षांच्या नियोजनाचा कृषि अनुसंधान परिषदेने तयार केलेला कृती आराखडा राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी आज जाहीर केला.

कोरोनामुळे राज्यातील सर्वाधिक जिल्हे बाधित आहेत. त्यातील बहुतांश जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. अशा परिस्थितीमध्ये भारतीय कृषि अनुसंधान परिषदेने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे कृषि विद्यापीठातील शैक्षणिक गुणवत्ता अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले.

कृषिमंत्री श्री. भुसे यांनी आज फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला. त्यावेळी या कृती आराखड्याबाबत माहिती देताना मंत्री श्री. भुसे म्हणाले, राज्यातील बहुतेक कृषि महाविद्यालयांची वसतिगृहे जिल्हा प्रशासनाने रुग्णांच्या विलगीकरणासाठी अधिग्रहित केलेली आहे.

अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित अंतर राखणे, त्यांच्या आरोग्याची दक्षता घेण्यासह कृषि व संलग्न विषयातील सम सत्रातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याचे नियोजित आहे.

कोरोनाच्या संकटात विद्यार्थ्यांची सुरक्षा, स्वास्थ्य आणि सुरक्षित अंतर अबाधित राखण्याच्या दृष्टीने आणि राज्यातील चारही कृषि विद्यापीठामधील शैक्षणिक गुणवत्ता अबाधित राखण्यासाठी संचालक शिक्षण समन्वय समितीने सत्रनिहाय परीक्षेकरिता कृती आराखडा तयार केला आहे.

यात प्रामुख्याने कृषि पदविका (दोन वर्ष) अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाद्वारे १०० टक्के गुण देऊन द्वितीय वर्षात प्रवेश देण्यात येईल.

तर द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा लॉकडाऊन उघडल्यानंतर संबंधित क्षेत्रातील परिस्थितीनुसार शक्यतो जून महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात घेण्यात येईल.

कृषि तंत्र निकेतन (तीन वर्ष) अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे १०० टक्के मूल्यमापन अंतर्गत गुणांनुसार करण्यात येईल व व्दितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना मागील वर्षाचे ५० टक्के गुण आणि ५० टक्के अंतर्गत गुणांनुसार तृतीय वर्षात प्रवेश दिला जाईल.

तर अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा लॉकडाऊन उघडल्यानंतर जवळपास  दि.८ ते १५ जूनच्या दरम्यान संबंधित क्षेत्रातील परिस्थितीनुसार घेण्यात येईल.

पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांना भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या मार्गदर्शक तत्वानुसार पुढील सत्रात प्रवेश देण्यात येईल.

त्याकरिता ५० टक्के गुण चालू सत्राच्या विद्यापीठाने स्वीकृत केलेल्या अंतर्गत मूल्यमापनावर आधारित देण्यात येतील आणि उर्वरित ५० टक्के गुण हे मागील सत्रांचे घोषित निकालांच्या सरासरीवर (CGPA) आधारित देण्यात येतील.

पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम सत्र परीक्षा (आठव्या सत्रातील) ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने १५ जून २०२० पूर्वी घेण्यात येतील आणि या परिक्षेचा निकाल हा १५ जुलैपूर्वी जाहीर करण्यात येईल.

पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची अंतिम सत्र परीक्षा आणि संशोधन घटक (शोधनिबंध) हे भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या सल्ल्याने घेतल्या जातील. त्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धत वापरत लॉकडाऊन उघडल्यानंतर पुढील परिस्थिती आणि वेळेनुरूप मुल्यमापित केले जातील.

शोधनिबंध सादर करण्याची अंतिम मुदत ३१ मे २०२० होती अशा विद्यार्थ्यांना शोधनिबंध सादर करण्याकरिता ३१ जुलै २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

त्याच प्रमाणे पदवी अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या व पाचव्या सत्राची नोंदणी दि.१ ऑगस्ट २०२० रोजी होणार असून पदवी अभ्यासक्रमाच्या सातव्या सत्राची नोंदणी ही दि.१ जुलै २०२० रोजी होणार आहे. तर पदवी अभ्यासक्रमाच्या नवीन वर्षाचे प्रथम सत्राचे प्रवेश हे दि.१ सप्टेंबर २०२० पासून सुरू होणार असल्याचे त्यांनी कळविले आहे.

लॉकडाऊनचा कालावधी वाढल्यास वरील नियोजनामध्ये काही प्रमाणात फेरबदल होऊ शकतात असेही त्यांनी नमूद केले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24