मुंबई, दि. १२: राज्यात एकाच दिवशी कोरोनाचे ५८७ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आल्याची विक्रमी नोंद राज्याचा नावावर झाली असून आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नांमुळे रुग्णांसोबतच त्यांच्या नातेवाईकांनाही दिलासा देण्याचं काम होत आहे.
जागतिक परिचारिका दिनाच्या पूर्वसंध्येला एवढ्या संख्येने रुग्ण बरे झाल्याची भेट राज्याला मिळाल्याची भावना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली.
काल सोमवारी ठाणे येथील २०९ रुग्णांना घरी सोडण्यात आले. पुणे येथील १६१ मुंबईतल ५५, रायगड येथील ५३ औरंगाबाद येथील ४३ अशा प्रकारे राज्यभरात ५८७ रुग्णांना घरी सोडण्यात आले.
आज त्यात बरे होणाऱ्या ३०० हून अधिक रुग्णांची अजून भर पडल्याने राज्यभरात ५००० रुग्ण बरे झाले आहेत.
डॉक्टरांच्या उपचाराला आणि रुग्णांच्या इच्छाशक्तीला यशस्वी करण्यातील सर्वात महत्त्वाचा दुवा परिचारिका ठरत असून रुग्णाची शुश्रुषा करुन त्याला बरं करण्यासाठी त्या परिश्रम घेत आहेत.
कोरोनाच्या लढ्यात रुग्णांना बरं करण्यासाठी डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून अहोरात्र झटणाऱ्या, हिमतीने लढणाऱ्या सर्व परिरचारिकांना आरोग्यमंत्र्यांनी आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनाच्या शुभेच्छा यावेळी दिल्या.
उपचार करणारे डॉक्टर्स, नर्स, आरोग्य कर्मचारी यांच्याबरोबरच आरोग्यमंत्र्यांनी रुग्णांच्या नातेवाईकांचे देखील अभिनंदन केले आहे.
समाजात कोरोनामुळे भीतीचे वातावरण असताना रुग्ण बरे होत आहेत ही सकारात्मक बाब पुढे येत असल्याने भीतीचे प्रमाण कमी होण्यास मदत होत आहे.
लक्षणीय बाब म्हणजे गेल्या आठवड्यात सोमवारी पहिल्यांदाच ३५० रुग्णांना घरी सोडलेच्या बरोबर एक आठवड्यानंतर पुन्हा एकदा विक्रमी संख्येत रुग्ण घरी सोडण्यात आले आहेत.
सोमवारी दि. ११ मे रोजी मुंबई महापालिका क्षेत्रातील ५५, ठाणे २०९, रायगड ५३ असे मुंबई मंडळात एकूण ३२१ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत एकूण ३१६० रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.
पुणे १६१ तर सातारा येथील १४ असे पुणे मंडळात एकूण १७५ रुग्णांना घरी सोडले तर आतापर्यंत एकूण ११४६ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. नाशिक मंडळात आतापर्यंत एकूण १३४ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.
कोल्हापूर मंडळात आतापर्यंत एकूण ४२ रुग्णांना, औरंगाबाद मंडळात एकूण ११७, लातूर मंडळात एकूण १२, अकोला मंडळात एकूण १०१ तर नागपूर मंडळात आतापर्यंत एकूण ७४ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.