मुर्तिजापूर येथील कापूस खरेदी केंद्र कार्यान्वित

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अकोला : ‘हॅलो, मी बच्चू कडू बोलतोय, भाऊराव फाटे बोलतात का? आपण कापूस खरेदीसाठी नोंदणी केली आहे.

तर आपण आता उद्या या सकाळी नऊ वाजता, ओम जिनिंग फॅक्टरीला…’ दस्तूरखुद्द पालकमंत्री बच्चू कडू यांनीच शेतकऱ्यांना फोन करुन कापूस खरेदीसाठी येण्याचा निरोप दिला

आणि सीसीआय मार्फत मुर्तिजापूर येथे सुरु झालेल्या कापूस खरेदी केंद्रावरील कापूस खरेदीची प्रक्रिया कार्यान्वित झाली.

येथील मुर्तिजापूर तालुक्यासाठी सीसीआय चे कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यास मान्यता देण्यात आली असून तेथील ओम जिनिंग फॅक्टरी येथे कापूस खरेदी प्रक्रियेसाठी तयारी सज्ज करण्यात आली आहे.

प्रशासनाने केलेल्या या खरेदी तयारीची पाहणीही पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ  बच्चू कडू यांनी मुर्तिजापूर  येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथील कापूस खरेदी केंद्रास भेट देऊन केली.

यावेळी सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रविण लोखंडे, उपविभागीय अधिकारी मुर्तिजापूर अभयसिंह मोहिते,  तालुका खरेदी विक्री संघाचे सचिव  रितेश मडगे, सहायक जितेंद्र कांबे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी माहिती देण्यात आली की, मुर्तिजापूर येथील कापूस खरेदी केंद्रावर कापूस विक्रीसाठी ८५८ शेतकऱ्यांनी कालपासून (दि.११) नोंदणी केली आहे. या ठिकाणी ओम जिनिंग फॅक्टरी येथे कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे.

कोरोना विषाणूच्या संसर्गाची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांना आधी फोन वरुन नोंदणी करता येणार आहे.

त्यानुसारच शेतकऱ्यांना फोन करुन आपला कापूस खरेदी केंद्रावर आणण्याबाबत सूचना दिली जाणार आहे. यावेळी स्वतः पालकमंत्र्यांनीच ही सूचना शेतकऱ्यांना देऊन खरेदी प्रक्रियेचा निरोप दिला.

त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती मुर्तिजापूर आवारातील नाफेडच्या तुर व हरभरा खरेदी केंद्रास पालकमंत्री कडू यांनी भेट दिली.

यावेळी  व्यवस्थापक धिरज मुळे यांनी आतापर्यंत शासनाकडून ९८८ शेतकऱ्यांची  १४ हजार ५०० क्विंटल  तुर  व  ३०५ शेतकऱ्यांचा सहा हजार ५०० क्विंटल  हरभरा खरेदी करण्यात आला  असल्याची माहिती दिली. शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा  त्रास शेतमाल विक्रीस आणताना होऊ नये, असे निर्देश पालकमंत्री  बच्चू कडू यांनी दिले.

तत्पूर्वी पालकमंत्री यांनी ओम जिनिंग फॅक्टरीला भेट देऊन कापूस खरेदीसाठी करण्यात आलेल्या तयारीची पाहणी केली  व योग्य सूचना संबंधितांना दिल्या.

अहमदनगर लाईव्ह 24