शिक्षक भरतीवर अनिश्‍चिततेचे सावट

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर :- आचारसंहितेपूर्वी शिक्षक भरती करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभाग तसेच राज्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे, परंतु शिक्षक भरतीसाठी आवश्यक बिंदूनामावली विभागीय मागासवर्ग कक्षाकडून तपासणे अद्याप बाकी आहे.

त्यातच राज्यात अनेक जिल्ह्यात एसईबीसी प्रवर्गासाठी जागाच रिक्त नाहीत. त्यामुळे संबंधित प्रवर्गातील विद्यार्थी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. तर काही विद्यार्थी शिक्षकांच्या पात्रतेवरून न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे शिक्षक भरतीवर अनिश्‍चिततेचे सावट निर्माण झाले आहे अशी माहिती शिक्षक नेते सुनिल गाडगे यांनी दिली.

अहमदनगर शिक्षक भारती कार्यालयात शिक्षक भरतीवर महत्वाची बैठक घेण्यात आली. तसेच शिक्षक आमदार कपिल पाटील, राज्याध्यक्ष अशोक बेलसरे हे गुरुवारी शिक्षणमंत्र्यांची भेट घेऊन शिक्षक भरती बद्दल चर्चा करणार आहेत. त्यांनतर पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल.

बैठकीत पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करुन शहिद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

पुढे बोलताना शिक्षक नेते सुनिल गाडगे म्हणाले कि, येत्या 15 दिवसांत लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आचारसंहितेपूर्वी शिक्षक भरती करण्यासाठी शिक्षण विभागाने कंबर कसली आहे, त्यादृष्टीने आवश्यक बाबींची पूर्ततादेखील करण्यात येत आहे.

परंतु अगोदर 16 टक्के आरक्षणाच्या अध्यादेशानुसार बिंदूनामावली दुरुस्त करण्याचे आदेश देण्यात आले होते. आता 16 फेब्रुवारी रोजी राज्याचा खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (ईडब्ल्यूएस) या प्रवर्गासाठी 10 टक्के आरक्षणानुसार सुधारित बिंदूनामावली विहित करण्याचे आदेश शासनस्तरावरून देण्यात आले आहेत.

त्यामुळे बिंदूनामावलीत दुरुस्ती करण्यास विलंब लागत आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप बोलताना म्हणाले कि, फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात का होईना जाहिरात प्रसिद्ध करून शिक्षक भरतीला सुरुवात करण्यात येणार असल्याचे राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी स्पष्ट केले असले तरी ग्रामविकास विभागाकडून मिळत नसलेले सहकार्य, त्याचबरोबर राज्यात शिक्षक भरतीत 16 टक्के जागा मराठा समाजाला मिळणार अशी घोषणा करण्यात आली होती.

परंतु प्रत्यक्षात अनेक जिल्ह्यात मराठा समाजासाठी जागाच रिक्त नसल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे भरती प्रक्रियाच अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मागासवर्गीय कक्षाकडून मात्र शिक्षक भरतीसाठी खासगी 450 संस्थांची बिंदूनामावली तपासली आहे.

तर जिल्हा परिषदेची बिंदूनामावली तपासून पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात शिक्षक भरतीची जाहिरात निघणार की अनिश्‍चिततेचे सावट कायम राहणार याकडे शिक्षक भरतीसाठी इच्छुक उमेदवारांचे डोळे लागले आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24