अमरावती : कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी संपूर्ण जिल्ह्यात ‘अमरावतीकर, मात करुया करोनावर’ ही मोहीम राबविण्यात येत असून, मोहिमेचा तिसरा टप्पा सुरु करण्यात आला आहे.
हे सर्वेक्षण अचूक असावे व त्यातून एकही व्यक्ती सुटणार नाही, याची खबरदारी घेण्याचे निर्देश पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले.
त्याचप्रमाणे, जिल्ह्यात रूग्णालये व आरोग्य सेवा अद्ययावत व सुसज्ज करण्याबाबत परिपूर्ण आराखडा करावा, असेही निर्देश त्यांनी दिले.
मोहिमेत घरोघरी जाणाऱ्या आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांना नागरिकांनी परिपूर्ण माहिती द्यावी. कुठलीही माहिती लपवू नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
जिल्ह्यात व्यापक सर्वेक्षण करण्याचे निर्देश पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले होते. त्यानुसार अमरावतीकर मात करूया कोरोनावर ही मोहीम राबविण्यात येत आहे.
या मोहिमेचा पहिला टप्पा २ ते ६ एप्रिल या कालावधीत पार पाडला. २० ते २३ एप्रिल या दुसऱ्या टप्प्यात ग्रामपंचायत तसेच नगरपालिका नगरपंचायत गावपातळीवर समितीमार्फत सर्वेक्षण करण्यात आले. तिसरा टप्पा १३ ते १७ मे या कालावधीत राबवला जात आहे.
ग्रामीण भागात कोरोना दक्षता व संनियंत्रण समिती सदस्यांमार्फत प्रत्येक कुटुंबाला गृहभेटी देऊन सर्दी, ताप, खोकला, श्वसनास आजार असलेल्या व्यक्तींची नोंद घेण्यात येणार आहे.
सारी आजाराबाबतही माहिती या सर्वेक्षणातून मिळविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, आरोग्य तपासणीही केली जाणार आहे.
कोरोना प्रतिबंधासाठीच्या उपाययोजनांबाबत जनजागृतीही मोहिमेत केली जाणार आहे. या मोहिमेत घरी येणाऱ्या कर्मचाऱ्याला नागरिकांनी योग्य माहिती देण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.
कंटेनमेंट झोनवर लक्ष केंद्रित करावे
कंटेनमेंट झोनवर लक्ष केंद्रित करून तपासण्यांना वेग द्यावा. कोणत्याही परिस्थितीत कंटेनमेंट झोनमध्ये कडक बंधने पाळली जातील याकडे लक्ष द्यावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
चाचण्यांची संख्या वाढावी म्हणून हैदरपुरा येथे स्वॅब टेस्टिंग सेंटर सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत, असेही त्यांनी सांगितले.
पालकमंत्री श्रीमती ठाकूर पुढे म्हणाल्या, प्रतिबंधात्मक उपाययोजना या केवळ तात्कालिक न राहता आरोग्य यंत्रणा कायमस्वरूपी सक्षम व सज्ज असावी, यासाठी नव्या सुविधांची भर घालण्याचे नियोजन आहे.
उपजिल्हा रूग्णालये, मोझरी, अचलपूर, चांदूर बाजार यासह जिल्ह्यात विविध ठिकाणी कोविड-१९ किंवा तत्सम आजारासंबंधी तत्काळ उपचारासाठी सर्व आवश्यक साधनसामुग्री सुसज्ज करण्यात येणार आहे.
भविष्यात कुठलीही आपत्ती उद्भवल्यास तात्काळ उपचाराची सुविधा उपलब्ध असण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले.
जिल्ह्यात रोज नव्याने रुग्ण आढळत आहेत. गुरुवारी दुपारपर्यंत जिल्ह्यात आढळलेल्या रुग्णांची आकडेवारी ९० वर पोहोचली आहे. या संकटावर मात करण्यासाठी यंत्रणांकडून विविध प्रयत्न होत आहेत.
मात्र, नागरिकांच्या सहकार्याशिवाय ही लढाई जिंकता येणार नाही. कोरोनाविरुद्धच्या या लढाईत जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग हा अपेक्षित आहे.
त्यामुळे कुठलीही माहिती लपवू नये. या काळात विविध प्रकारच्या अफवा पसरत आहेत. त्यावर अजिबात विश्वास ठेऊ नये.
घराबाहेर पडताना मास्क वापरण्याची व सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी पालकमंत्र्यांनी केले.