शिर्डी : साईबाबांच्या उदी व तीर्थ सेवनाने तुम्हाला ऐश्वर्य प्राप्त होईल. सर्व दु:ख नाहीसे होईल, अशी भुरळ पाडून भाविकांना गंडा घालणाऱ्या महिलेस भाविकांच्या सतर्कतेमुळे पकडण्यात यश मिळाले आहे. भाविकांना फसविण्याच्या नाना तऱ्हेने शिर्डीत ठकसेन फसविताना आजवर अनेक प्रकार उघडकीस आले आहेत.
आता हा नव्याने प्रकार पुढे आल्याने संताप व्यक्त केला जात आहे.. साईबाबांची महती देश विदेशात पोहोचली असून मोठ्या श्रद्धेने भाविक बाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येत असतात. भाविकांच्या श्रद्धेचा फायदा काही संधीसाधू घेत असल्याचे प्रकार साईनगरीत घडत आहे.
यामुळे भाविकांना मनस्तापास सामोरे जावे लागत आहे. असाच प्रकार दिल्लीहून आलेल्या साईभक्ताच्या बाबतीत घडला आहे. दिल्ली येथील आनंद पाल हे आपल्या पत्नीसह साई दर्शनासाठी शिर्डीत आले होते. त्यांनी साईआश्रम येथे रुम घेतली होती.
यावेळी त्यांच्या पत्नी सुमन पाल यांना एक महिला भेटली. तिने बोलण्याची भुरळ पाडली. माझ्याकडे साईबाबांची उदी तसेच स्नानाचे तीर्थ आहे. तुम्ही ही उदी व तीर्थ घेतल्यास तुम्हाला ऐश्वर्य प्राप्त होईल. घरात सुखशांती मिळेल. सर्व दु:ख नाहीसे होईल, असे सांगून दीड हजार रुपये घेऊन उदी व तीर्थ दिले.
याबाबतची माहिती साईभक्त महिलेच्या पतीस समजली. त्यांना संशय आल्याने त्यांनी या महिलेने दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.
मात्र संपर्क न झाल्याने त्यांनी संस्थानच्या सुरक्षा रक्षकास झालेला प्रकार सांगितला. सुरक्षा रक्षकांनी क्षणाचाही विलंब न करता या गंडा घालणाऱ्या महिलेस पकडले व पोलिसांच्या ताब्यात दिले.