गरिबांच्या स्वयंपाकाला ‘उज्ज्वला’चा गॅस..!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

बुलडाणा, दि. 14 : कोरोना विषाणूच्या थैमानानंतर सर्वत्र खळबळ उडाली. शासनाने कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशभर टाळेबंदी जाहीर केली.

त्यामुळे अनेक नागरिकांचा रोजगार थांबला, परिणामी दोन वेळच्या जेवनाचे काय? असा प्रश्न उभा राहिला. त्याची झळ गरीब कुटूंबांना बसत असल्याचे लक्षात येताच शासन उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून गरिबांच्या मदतीला धावून आले.

शासनाने एप्रिल, मे व जून महिन्याकरिता योजनेच्या पात्र लाभार्थ्यास सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला. गरिबांच्या स्वयंपाकाला उज्ज्वला योजनेचा गॅस मिळाला आहे.

सिलेंडर प्राप्त करण्यासाठी लाभार्थ्यांना या कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात एजन्सीवर गर्दी करण्याची गरज नाही. सिलेंडरची ‘डिलिव्हरी’ सुद्धा घरपोच देण्यात येत आहे.

स्वयंपाकाचा गॅस मोफत मिळाल्यामुळे अनेक गरिबांच्या स्वयंपाकघरात स्वयंपाक होत आहे. उज्ज्वला योजनेमुळे या गरीब कुटूंबांना बऱ्याच अंशी दिलासा मिळाला आहे.

मोफत सिलेंडर देण्याच्या निर्णयानुसार एक उज्ज्वला योजनेचा ग्राहक प्रति महिन्यात एक सिलेंडर मिळण्यासाठी पात्र आहे. तसेच उज्ज्वला लाभार्थी अंतिम रिफिल मिळाल्यानंतर 15 दिवसाच्या अंतराने पुढील रिफिल बुकींग करू शकतो.

लाभार्थ्यांना त्यांनी लिंक केलेल्या बँक खात्यात मोफत एलपीजी सिलेंडर खरेदी करण्यासाठी एक रिफीलकरिता पूर्ण रक्कम 5 एप्रिल 2020 पर्यंत अग्रिम स्वरूपात हस्तांतर करण्यात आली आहे.

रिफिलची बुकिंग नोंदणीकृत मोबाइल क्रमांकाने केली जाणार आहे. ग्राहकांना रिफिल प्राप्त केल्यानंतर त्यांच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबर वर प्राप्त ओटीपी संबंधित एजेंसीला द्यावा लागेल.

एजन्सीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तसेच सिलेंडरची वाहतूक, ने-आण करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा तेल कंपन्यांनी 5 लक्ष रूपये विमा काढला आहे.

त्यामध्ये शोरूम स्टाफ, गोडाऊनकीपर्स, मॅकेनिक आणि डिलिवरी बॉय आदी कर्मचारी देशभर सर्व ग्राहकांना सातत्याने एलपीजी सिलेंडरचा पुरवठा करीत आहे. अशा संकटाच्या काळातही ते आपले कर्तव्य पार पाडत आहेत.

सर्व तेल कंपन्यांचे गोदाम कीपर, मॅकनिक आणि डिलिवरी बॉय, सर्व ट्रक चालक आपला जीव धोक्यात घालून अत्यावश्यक बाबीचा पुरवठा निश्चित करीत आहेत.

उपरोक्त सर्व प्रकारातील कर्मचाऱ्याचा दुर्देवाने कोरोनाची बाधा होवून मृत्यू झाल्यास सदर व्यक्तीच्या कुटूंबीयांना पाच लक्ष रूपये आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे.

केवळ गरिबांच्या स्वयंपाकाचीच काळजी नाही, तर स्वयंपाक पूर्ण करण्यास सिलेंडरचा पुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही काळजी घेण्यात आली आहे. जिल्ह्यात 1 लक्ष 68 हजार 86 उज्ज्वला योजनेचे ग्राहक आहेत.

यासर्व ग्राहकांना सिलेंडरचा पुरवठा करण्यात आला आहे. उज्ज्वला योजनेचे सर्वात जास्त 32 हजार 36 पात्र लाभार्थी बुलडाणा तालुक्यात आहे.

त्याचप्रमाणे चिखली तालुक्यात 6112, दे.राजा 19267, जळगांव जामोद 9705, खामगांव 18742, लोणार 2699, मलकापूर 10405, मेहकर 12546, मोताळा

15172, नांदुरा 21 हजार 885, संग्रामपूर 6232, सिंदखेड राजा 10738 आणि शेगांव तालुक्यात 2547 लाभार्थी आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात सर्व 1 लक्ष 68 हजार 86 पात्र लाभार्थ्यांना उज्ज्वला योजनेचे सिलेंडरचा लाभ मिळत आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24