हल्ली दिवस उजाडायचा आधीच ‘ती’ उठलेली असते…घरादारातील सारं आवरून ‘ती’ घराबाहेर पडते…तोंडावर मास्क…पर्समध्ये आणखी जास्तीचे मास्क ठेवते कारण…कोणाकडे नसला तर ती मास्कही देतेय…सोबत पेन आणि नोंदवही…पाण्याची बाटली असते…होय, ‘ती’ हल्ली पहाटेच घर सोडतेय…अनेक उंबरे झिजवतेय…भाऊ, दादा, ताई, अक्का म्हणत…जनजागृती करतेय…कधी गावातल्या गावात…तर कधी कोस-दोन कोस दूरच्या वाड्या-वस्त्यांवरहीगावातही जाते…स्वच्छतेचा, स्वत:सह परिवाराचा बचाव करण्याचा आणि एकूणच जगण्याचा मंत्र देत ‘ती’ भर उन्हात फिरतेय…‘ती’ एक ‘आशा’ आहे.…जगण्याची, जीवनाची, ती ‘आशा सेविका’ आहे…
संपूर्ण जगावर घोंगावत असलेल्या कोरोनालढ्यात आज शासन, प्रशासन, पोलीस, आरोग्य यंत्रणा दिवसरात्र एक करून लढा देत आहे. या लढ्यात मोठमोठ्या यंत्रणेसोबत एक वही आणि पेन घेवून जिल्ह्याभरातील आशासेविकाही दिवसभर जनजागृती करीत आहेत. उन्हाचा पारा चाळीशी गाठत असताना या आशासेविका रोज कोरोनाशी लढा देत आहेत. ग्रामस्थांच्या नोंदी घेत आहेत. ‘घरातच थांबा, काही लक्षणे असतील तर जवळच्या आरोग्य केंद्रात जा’, असा मोलाचा ‘आशा’दायी सल्ला त्या देत आहेत.
जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोडे, पोलीस आयुक्त विश्वास नागरे-पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंग आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे गेल्या दीड महिन्यांपासून लढा देत आहेत. या यंत्रणेला ग्रामीण भागातून आशासेविका मोठे सहाय्य करीत आहेत. कोरोनाच्या लढ्यात त्यादेखील खारीचा वाटा उचलित आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका आशासेविकेशी प्रातिनिधीक स्वरुपात संपर्क साधला असता प्रत्येकीने आदबीने ‘नमस्कार मॅडम बोला’, अशी सुरुवात करताच त्यांची काम करण्याची तळमळ जाणवली. जिल्ह्यातील काही आशासेविकांच्या कार्याचा हा घोषवारा, त्यांच्याच शब्दात…
स्टे होम, सेव्ह लाईफ
आम्ही आशावर्कर. आलेलं प्रत्येक आव्हान स्वीकारायला सतत तयार असतो. आमचा तीन जणांचा गट आहे. त्यात अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा. असे आम्ही तिघे सकाळी लवकर घरातील आवरून सर्वे करण्यासाठी निघतो. प्रत्येक दिवशी आम्हाला २५ घरांचे लक्ष्य दिले आहे. त्याप्रमाणे आमचे काम सुरू आहे. प्रत्येक घरात जावून विचारणा करतोय. तुमच्याकडे बाधित भागातून कुणी आलंय का, घरात कुणाला सर्दी, खोकला, ताप अशी कोरोनाविषयक लक्षणे आहेत का, याची माहिती घेतोय. आवश्यक वाटल्यास प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करण्यासाठी सांगतोय. यासह कोरोनाविषयी रोगाची सगळी माहितीही देतोय. प्रत्येकाला ‘स्टे होम व सेव्ह लाईफ’चा मंत्र देतोय.
गायत्री गाडेकर, सामनगाव, उपकेंद्र पळशे ता. नाशिक
व्हॉट्स ॲपग्रुपच्या माध्यमातून माहिती अद्ययावत
आम्हांला दिलेल्या रामराव नगरचा एक ग्रुप तयार केला आहे. ज्या-ज्या घरांना आम्ही भेटी देतो त्या घरातील एक व्यक्तीचा व्हॉटस् अॅप नंबर घेवून त्याला त्यांना ग्रुपमध्ये अॅड करातोय. मग त्या ग्रुपमधे प्रत्येक व्यक्तीने कुणी बाहेरून आले असेल तर त्याची माहिती द्यावी तसेच काही कोरोना आजाराची लक्षणे दिसल्यास, वृद्ध माणसांना काही त्रास झाल्यास ते ग्रुपद्वारे कळवतात. यामुळे आम्हांला प्रत्येक घराला सेवा देणं सहज शक्य होते. हे सर्व काम करत असताना आमचे रुटीन कामेही सुरू आहेत. हा व्याप सांभाळू मी या महिन्यात दोन महिलांच्या प्रसुतीही केली. देश अवघड स्थितीत असताना मदत करताना खूप अभिमान वाटतो.
सारिका उनव्हणे, काननवाडी, घोटी उपकेंद्र. ता.इगतपुरी
आम्ही घेतो जनतेची काळजी
मला पाच वर्षांची मुलगी आहे. तिला कधी, सासूबाईंकडे तर कधी जावेकडे सोडून मी कामावर जाते. कोरोनाचे सावट असताना काम करताना भीती वाटते, पण शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून आम्ही सर्व प्रकारची काळजी घेत काम करीत आहोत. आमच्या गावात आम्ही मास्क व सॅनिटायझरचे महत्त्व समजावून सांगितले व गावानेही सहकार्य केले.
माधुरी खांदवे, पिंपळनारे, प्रा. आ. केंद्र, तळेगाव ता. दिंडोरी
कोरोनातून जग नक्कीच सावरेल
सगळ्या जगाला वेठीस धरणाऱ्या कोरोनाशी दोन हात करायला सगळेच सज्ज आहे. सर्वजण रात्रंदिवस या विषाणूशी लढा देत आहेत. सगळ्यांच्या या प्रयत्नांना यश येवून या संकटातून जग नक्कीचं सावरणार, असा आशावाद निफाड तालुक्यातील प्रिती नाईक यांनी व्यक्त केला. रोज २५ ते ३० घरांचा सर्वे करायचा व नंतर गरोदर माता इतर महिलांविषयीचे कामे करायची. हे सर्व करीत असताना गावात कोणी नवीन आले आहे, यावरही लक्ष ठेवत आहोत. गावकऱ्यांना खूप समजावून सांगत आहोत, गैरसमज न होवू देता काम करीत आहोत.
प्रिती नाईक निफाड, उपकेंद्र पिंपळगांव बसवंत, ता.निफाड
आम्ही देशहितासाठी झटतोय
सरस्वती वाडी येथे आमचे काम चालते. गावं तसे अडीच हजार लोकसंख्येचे आहे. बरेचं लोक मळ्यात राहतात. त्यामुळे त्यांच्या उंबऱ्यापर्यंत जाण्यासाठी आम्ही दोन किलोमीटर जातो. तरीही आम्ही खूप आंनदाने हे काम करीत आहोत. कारण आम्हांला दिलेली जबाबदारी व आमचं काम हे देशाच्या हितासाठी असल्याची भावना ज्योती निकम यांनी व्यक्त केली. त्या सांगतात, ‘गावातील प्रत्येक घराला सुरक्षा, संयम, स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगतोय व गावातील लोकही खूप चांगला प्रतिसाद देत आहे’.
ज्योती निकम, सरस्वती वाडी, प्रा.आ.केंद्र लोहणेर, ता.देवळा
गावातील लोक डॉक्टरच्या रुपात पाहतात
आम्ही गावातील लोकांसाठी अर्ध्यारात्रीसुद्धा मदतीला धावून जातो. आमचे काम पाहून गावाने आमच्यावर पूर्ण विश्वास टाकला आहे. आशा जे करेल ते गावच्या भल्यासाठीचं असेल म्हणून आशाला गावातील डॉक्टर समजता. गावातील लोकांचा विश्वास संपादन केल्यामुळे कोरोनाचा सर्वे करताना गावातील लोकांची मदत मिळाली. तसेच वेळोवेळी गावाने मला सन्मानित देखील केले आहे. कामाची पावती म्हणून मला ‘आंनदीबाई जोशी पुरस्कार’ही मिळाल्याचे सुरेखा खैरनार यांनी सांगितले.
सुरेखा खैरनार, उपकेंद्र नामपूर, ता. बागलाण
लहान मुलांची व वृद्धांची काळजी घेतो
सुरगाणा हा आदिवासी भाग आहे हे लक्षात घेवून कोरोनाचा सर्वे करतांना प्रत्येक घरात सांगितले की, जर घरात लहान मुले व वृद्ध असतील तर त्यांची योग्य काळजी घ्या. तसेच हात धुण्याच्या पद्धती, मास्क वापरण्याचे महत्त्व, सर्दी व खोकला इतर काही लक्षणे दिसल्यास तत्काळ आम्हांला कळविण्यासाठी आम्ही आमचे संपर्क क्रमांक प्रत्येक घरात दिले असल्याचे रंजना पानडगळे यांनी सांगितले.
रंजना पानडगळे, उपकेंद्र जाहुले, प्रा. आ. केंद्र अंजनेरी, ता. सुरगाणा
शासन घेतेय आमची काळजी आम्ही घेवू जनतेची
कोरोनाचा सर्वे करताना आमचे कुटुंबिय खूप चिंतेत होते. परंतु शासनाने सर्वेक्षणाचे काम करतांना आवश्यक मास्क, सॅनिटायझर व इतर आवश्यक बाबी दिल्या आहेत. त्यामुळे आम्ही खूप चांगल्या पद्धतीने काम करतोय. शासन आमची काळजी घेत आहे. आम्ही जनतेची घेतोय. तसेच काम करतांना आम्ही सनकोट, मास्क, गॉगल, पाणी, सॅनिटायर्झस या सर्व बाबी घेवूनच बाहेर पडतो त्यामुळे काम करतांना अडचणी येत नाही.
अनिता निकम, शिरसमणी उपकेंद्र, कळवण
केव्हाही फोन करा, आशा हजर
आम्ही आशा फक्त ठरवून दिलेलं काम न करता सामजिक जाणिवेतून गावात कुणालाही आमची मदत लागल्यास केव्हाही फोन आल्यास आम्ही त्यांच्या सेवेसाठी हजर होतो. कोरोना आजाराविषयी गावात जनजागृती करण्यात आली आहे. यामुळे गावात आमच्याविषयी एक सद्भावना, एक आदर निर्माण झाला आहे. यापुढील काळातही आम्ही सरकार आणि जनतेसाठी काम करीत राहणार आहोत.
मनिषा त्रिभुवन, सोनज, ता. मालेगाव
कोरोनाशी लढताना कुटुंबांचा मोठा आधार
कोरोना विषयीच्या बातम्या व वातावरण पाहून प्रत्येकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जेव्हा कोरोनाबाबत आम्हाला सर्वेक्षणाची जबाबदारी देण्यात आली तेव्हा माझ्याही घरातील सर्वजण थोडे घाबरलेच होते. परंतु या आजारविषयी माहिती घेवून त्यासाठी घेण्यात येणाऱ्या काळजीची त्यांनी माहिती घेतली व मलाही माझ्या कामात मदत केली. तसेच आमच्या गावातील लोकांचेही आम्हांला तेवढेच सहकार्य असल्याचे मोहिनी पवार यांनी सांगितले. शेवटी घरातून पाठबळ मिळाले तर कोणताही लढा आपण जिंकू शकतो ताई, असं त्या मोठ्या अभिमानानं सांगत होत्या.
मोहिनी पवार, प्रा. आ. केंद्र, उसवाड, ता. चांदवड
सरपंच व पोलीस पाटलांची मदत
कोरोनाविषयी सर्वेक्षण करताना मुंबई व ठाणे येथून आलेल्या लोकांना प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणीसाठी जावे असे सांगितल्यावर त्यांना राग यायचा. अशावेळी गावातील सरपंच व पोलीसपाटलांची मदत घेवून आम्ही हा प्रश्न सोडविल्याचे सरुताई कातोरे यांनी सांगितले. कोरोना आज ना उद्या हद्दपार होणार, पण माणसाचे माणसाशी असलेले नाते थोडी तोडता येईल, म्हणून आम्ही काम करताना सतत आपुलकी आणि प्रेम ठेवूनच संवाद साधतो, असेही सरूबाई सांगत होत्या.
सरूबाई कातोरे, शिवडे, प्रा. आ. केंद्र. पांढुंर्ली ता. सिन्नर
स्वत: च्या दु:खापेक्षा कर्तव्य महत्त्वाचे
पतीच्या निधनानंतरही मी परिवाराच्या व मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे. अशातच कोरोना आजाराविषयी जनजागृती व घरोघरी जावून त्याच्या नोंदी घेण्याचे काम आले. सर्व दु:ख बाजूला सारुन मी माझे कर्तव्य पार पाडत आहे. गावातूनही अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येकजण वैयक्तिक पातळीवर आपली काळजी घेत आहे. याचेच खूप समाधान मिळतेय.
मीना चव्हाण. मोहिमेची वाडी उपकेंद्र अंजनेरी ता. त्र्यंबकेश्वर
लोकांची मनातील भीती दूर करण्यास यश
कोरोनाविषयीची भीती शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर होती. आम्ही जेव्हा कोरोना संसर्गापासून आपला बचाव करण्यासाठी गावागावात माहिती देत होतो तेव्हा गावकरी खूप घाबरलेल्या अवस्थेत होते. परंतु अशावेळेस गावातील सरपंच, गामसेवक, ग्रामपंचायतीचे सदस्य यांच्या मदतीने आम्ही त्यांच्या मनातील भीती काढली व त्यांना कोरोनापासून बचावाचे व काळजी कशी घ्यावी याची माहिती दिली.
वृषाली गांगुर्डे, उपकेंद्र वंजारवाडी, ता. नांदगाव
वस्त्या वस्त्यावर जावून प्रबोधन
नगरसूल परिसरातील वाड्या-वस्त्यांवर जावून आम्ही रोज कोरोनाबाबत लोकांना माहिती देत आहोत. घरतील सदस्यांचा पाठिंबा मिळतोय. दिवसभर अनेक अडचणी येतात, पण त्यावर मात करून आम्ही लोकांपर्यंत पोहोचतो, त्यांना करोबाबत माहिती देतो. या संकटाला सगळ्यांनी धैर्याने सामोरे जायला हवे, असे नगरसूल येथील आशावर्कर कविता पाटोळे यांनी सांगितले. त्यांच्याशी बोलताना त्यांच्यात कामाबाबत खूप प्रामाणिकपणा असल्याचे वाटत होते.
कविता पाटोळे, नगरसूल, प्रा.आ.केंद्र राजापूर ता. येवला
आदिवासी भागातील लोक अधिक समजदार
शहरी लोकजीवन आणि ग्रामीण भागातील राहणीमान यात खूप फरक आहे. मात्र आमच्यासारख्या आदिवासी भागातील नागरिक कोरोनाबाबत खूप जागरूक आणि समजदार आहेत. त्यांना एकदा काही सांगितलं की ते त्याकडे खूप गांभीर्याने बघतात. आशावर्कर म्हणून अशा आदिवासी भागात काम करण्याची संधी मिळणे हे माझे भाग्यच समजते असे, धानपाडा येथील आशावर्कर जिजाबाई दरोडे यांनी सांगितले.
जिजाबाई दरोडे, धानपाडा, उपकेंद्र भुवन,ता,पेठ
मोहिनी राणे-देसले,
माहिती अधिकारी, नाशिक