मालेगाव : कोरोना विषाणूमुळे शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणात बाधित झाले आहेत. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर असल्याने त्याला प्रतिबंध घालण्यासाठी विविध अधिकारी व कर्मचारी यांच्या सेवा अधिग्रहित करून उपाययोजना युद्धपातळीवर राबविण्यात येत आहेत.
परंतु सेवा अधिग्रहित करूनही गैरहजर कर्मचाऱ्यांवर आता गुन्हे दाखल करण्याचे निर्देश इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरचे प्रमुख डॉ.पंकज आशिया यांनी दिले आहेत.
राज्य शासनाने कोरोना विषाणूचा (कोविड-१९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७, १३ मार्च २०२० पासून लागू करुन खंड २, ३ व ४ मधील तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी अधिसूचना निर्गमित केलेली आहे.
त्या अनुषंगाने याकामी आवश्यक असणारे मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या सेवा अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.
पैकी काही अधिकारी व कर्मचारी अजून हजर झाल्याचे दिसून येत नाही. तरी अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांवर आता गुन्हे दाखल करण्याचे आदेश डॉ. पंकज आशिया यांनी पारित केले आहेत.
शासनाच्या भूमिअभिलेख विभागातील उप-अधीक्षक, शिरस्तेदार, परीक्षण भूमापन यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता दर्जाचे अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यांची शहरातील विविध अधिग्रहित केलेल्या रुग्णालयांमध्ये समन्वय व संनियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
मात्र ते नेमणुकीच्या ठिकाणी हजर न झाल्यामुळे मनुष्यबळाचे व इतर सुविधांचे संनियंत्रण करताना मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत.
त्यामुळे आता आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५६ व साथरोग प्रतिबंध कायदा १८९७ तसेच भा.द.वि. १८६० मधील कलम १८८ नुसार अधिग्रहित केलेल्या गैरहजर अधिकारी व कर्मचाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल करुन अहवाल सादर करण्याबाबतही या आदेशात नमूद केले आहे.