श्रमिक विशेष रेल्वे १४५६ मजुरांसह उत्तरप्रदेशकडे रवाना

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

कोल्हापूर, दि. 14 : उत्तरप्रदेशकडे 1 हजार 456 मजूर श्रमिक विशेष रेल्वेने आज दुपारी 1 वाजता कोल्हापुरातून रवाना झाले. भारत माता की जय ! छत्रपती शाहू महाराज की जय ! चा नारा देत या मजुरांना सर्वांनी शुभेच्छा दिल्या.

उत्तरप्रदेश शासनाकडून मंजुरी आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने करवीर (ग्रामीण) मधील 1276, कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील 114, हातकणंगले तालुक्यातील 60 आणि कागल तालुक्यातील 6 अशा 1456 मजुरांची यादी करुन रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून उत्तरप्रदेशकडे जाणाऱ्या रेल्वेचे नियोजन केले.

कोल्हापूर महानगरपालिका परिवहन विभागाच्या बसमधून मंजुरी मिळालेल्या कामगारांना छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथे आणण्यात आले. याठिकाणी प्रवासाची रेल्वे तिकीटे त्यांना देण्यात आली.

जिल्हा प्रशासन आणि सेवाभावी संस्थांच्यावतीने या मजुरांना जेवण, नाश्ता आणि पाणी अशा किटचे वाटप करण्यात आले. प्रशासनाने त्यांची केलेली सुविधा आणि गावी जाण्याचा आनंद प्रत्येक मजुराच्या चेहऱ्यावर जाणवत होता.

मान्यवरांबरोबरच रेल्वेत बसलेल्या मजुरांनीही टाळ्या वाजवून आणि भारत माता की जय ! छत्रपती शाहू महाराज की जय ! अशा घोषणा देत आनंद व्यक्त केला.

थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायझर आणि सामाजिक अंतर याचा वापर करत त्यांना रेल्वेच्या बोगीमध्ये प्रवेश देण्यात आला.

तहसीलदार शीतल मुळे-भामरे तसेच डॉ. डी.वाय.पाटील पॉलिटेक्नीकचे प्राचार्य डॉ. महादेव नरके, नगरसेवक तौफिक मुल्लांनी आदींनी मजुरांशी संवाद साधत त्यांची आस्तेवाईकपणे विचारपूस केली. आज आणि उद्यासाठी त्यांना लागणाऱ्या जेवणाचे किट त्यांनी या मजुरांना दिले.

श्रमिक विशेष रेल्वेस तहसीलदार शीतल मुळे-भामरे, डॉ. डी.वाय.पाटील पॉलिटेक्नीकचे प्राचार्य डॉ. महादेव नरके यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून उत्तरप्रदेशकडे ही रेल्वे मार्गस्थ झाली. यावेळी रेल्वेचे स्टेशन प्रबंधक ए.आय.फर्नाडिस, नगरसेवक तौफिक मुल्लांनी,  बाबू बुचडे, प्रवीण पाटील, तानाजी लांडगे, महेश वारके आदी उपस्थित होते.

करवीर ग्रामीणमधील 1276, कोल्हापूर शहरामधील 114, हातकणंगले तालुक्यातील 60 आणि कागल तालुक्यातील 6 असे 1456 मजुर रेल्वेच्या 24 बोगीमधून उत्तरप्रदेशकडे आज रवाना झाले.

जिल्ह्यामधून आपापल्या गावी परतणाऱ्या विविध मजुरांना गेले तीन दिवस त्यांच्या दोन दिवसाच्या जेवणाची व्यवस्था डॉ. महादेव नरके यांच्या समन्वयाखाली सुरु आहे.

प्रत्येक कामगाराला जेवण, नाश्ता, पाण्याची बॉटल आणि मास्क याचे वितरण होत आहे. याची खातरजमाही डॉ. नरके यांनी केली. राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनमुळे अडकलेल्या कामगार, पर्यटक, प्रवासी, विद्यार्थी अशा सर्वांना त्यांच्या-त्यांच्या जिल्ह्यांमध्ये परत पाठवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

त्यामुळे या कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे, कोल्हापूर जिल्ह्यामधील कामगार त्यांच्या-त्यांच्या जिल्ह्याकडे घेऊन आतापर्यंत 4 श्रमिक विशेष रेल्वे रवाना झाल्या असून आजची ही पाचवी रेल्वे आहे.

या सर्वांच्या रेल्वेच्या तिकीटांचा खर्च हा मुख्यमंत्री निधीतून करण्यात आला आहे.  या कामगारांना दोन दिवस पुरेल अशा जेवण,नाश्ता,पाणी बॉटल तसेच मास्क या सर्वांची सुविधा पालकमंत्री सतेज पाटील यांच्या माध्यमातून  करण्यात आली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24