करंजी : शेवगाव -पाथर्डी विधानसभा मतदारसंघात मागील पाच वर्षांत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री पंकजाताई मुंडे, पालकमंत्री राम शिंदे, माजी खा. दिलीप गांधी, खा. सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून भरीव विकास निधी आणून विविध विकासकामे मार्गी लावली. त्यामुळे सूज्ञ मतदारांनी विकासाला प्राधान्य द्यावे. विरोधकांकडे कोणतेच मुद्दे नसल्याने शेवटची निवडणूक म्हणून जातीपातीचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला जात असून, जातीपातीच्या राजकारणाला शेवगाव -पाथर्डी मतदारसंघातील मतदार कधीही थारा देणार नाहीत, असे प्रतिपादन भाजप -शिवसेना महायुतीच्या उमेदवार आ. मोनिकाताई राजळे यांनी केले.
पाथर्डी तालुक्यातील कीर्तनवाडी, मालेवाडी, भारजवाडी, काटेवाडी, मीडसांगवी या भागात आ. राजळे यांनी प्रत्येक गावात जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेत पाच वर्षात केलेली विकासकामे मतदारांपुढे मांडली. उर्वरित विकासकामे करण्यासाठी व मतदारसंघ सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी पुन्हा एकदा संधी द्या, असे आवाहन केले. मीडसांगवी, कीर्तनवाडी येथील प्रचार सभेत बोलताना आ. राजळे म्हणाल्या, मागील पाच वर्षांत ग्रामविकासमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली या मतदारसंघाला मोठा विकास निधी मिळाला, त्यामुळे मतदारसंघातील सर्वसामान्य मतदार याची निश्चित जाणीव ठेवतील.
देशात व राज्यात भाजपा -महायुतीचे सरकार आल्यास मतदारसंघात विकासकामे निश्चित होतील. विरोधकांकडून करण्यात येणाऱ्या जातीपातीच्या मुद्याकडे दुर्लक्ष करा. गेल्या पाच वर्षांत मी कुणावरही वैयक्तिक टीका केली नाही; परंतू विरोधक स्वत:ची राजकीय पोळी भाजण्यासाठी समाजात द्वेष पसरवत असून, खालच्या पातळीला जाऊन टीका करत आहेत. याला सूज्ञ मतदार मतपेटीतून उत्तर देतील.