श्रीरामपूर :- काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाने फक्त मतदानासाठी मुस्लिम समाजाचा वापर केला आहे. बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी मागील सरकारने उपाययोजना केल्या नाहीत.अशी टीका खा.इम्तीयाज जलील यांनी श्रीरामपूरमध्ये बोलताना केली.
विधानसभा निवडणुकीतील एमआयएमचे उमेदवार सुरेश जगधने यांच्या प्रचार सभेत खासदार जलील बोलत होते.
विविध पक्षांमध्ये होणारे नेत्यांचे पक्षांतर खपवून घेतले जाते. मात्र एमआयएम पक्षाची मत कापणारे म्हणत बदनामी केली जाते. स्वत:ची मतपेढी निर्माण करण्याचा एमआयएमचा प्रयत्न आहे, असे खासदार इम्तीयाज जलील यांनी स्पष्ट केले.
जलील म्हणाले, दलित – मुस्लिम यांची मते आमची जहागिरी आहे, असा समज सर्वच पक्षांचा आहे. सत्तर वर्ष हेच काम करण्यात आले. मात्र आता एमआयएम स्वत:ची मतपेढी तयार करुन निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे.
पुढे बोलताना खा. जलील म्हणाले, राज्यात ४४ जागा पक्ष लढवीत आहे. त्यात मुस्लिमांबरोबर मुस्लिमांबरोबर दलित, मातंग, बंजारा, ख्रिश्चन समाजातील लोकांना उमेदवारी दिली आहे. केवळ मुस्लिमांचा पक्ष म्हणून या पक्षावर टीका होते.
झोपडपट्टीत दलित व मुस्लिम समाज राहतो. गेल्या ७० वर्षात त्यांचा विकास झाला नाही; मात्र त्यांची मते सर्वांनी घेतली. आपली सत्ता येत नाही तोपर्यंत आपल्याला लढावे लागेल.
या निवडणुकीत दलित , मुस्लिम मतदारांनी आपली मते विकत देवू नयेत , असे आवाहन त्यांनी केले.यावेळी पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अकिल मुजावर, शफी उल्ला काझी, जिल्हाध्यक्ष इम्रान शेख, साजिद मिझा, इरफान शेख, भागीनाथ काळे यावेळी उपस्थित होते.