गोरेगाव येथील एक हजार खाटांच्या ‘कोरोना काळजी केंद्रा’ची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

मुंबई, दि. १५- मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी गोरेगाव येथील नेस्‍को मैदानावर उभारण्यात येत असलेल्या कोरोना काळजी केंद्र २ (CCC २) व्यवस्थेची आज सकाळी पाहणी केली.

यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, बृहन्‍मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) संजीव जयस्वाल, सहआयुक्त (विशेष) आनंद वागराळकर आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी नेस्‍को मैदानावर सभागृह क्रमांक २ व ३ या ठिकाणी करण्‍यात आलेल्‍या व्‍यवस्‍थेची प्रामुख्‍याने पाहणी केली.

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्री. जयस्वाल यांनी नेस्को केंद्रावर करण्यात येत असलेल्या तयारीची सविस्तर माहिती दिली. एकूण १,२४० बेड क्षमता असलेले हे संपूर्ण केंद्र असणार आहे.

याठिकाणी ऑक्सिजन पुरवठादेखील उपलब्ध असेल. महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहे आणि स्नानगृहे, गिझर यासह प्रत्येक बेडला स्वतंत्र पंखा दिला जाणार आहे.

पुरेसे वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिका नेमण्यात येणार आहेत. संपूर्ण व्यवस्थेची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या तयारीबाबत समाधान व्यक्त केले

अहमदनगर लाईव्ह 24