नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी – महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

शिर्डी : कोरोना हे मानवजातीवरील संकट आहे. त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन सतर्क आहे. मात्र नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे.

तसेच सर्वांनी स्वयंशिस्त पाळणे गरजेचे आहे, असे वाहन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

अमृतवाहिनी महाविद्यालयाच्या प्रांगणात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत आयेाजित करण्यात आलेल्या बैठकीत संगमनेर शहर, धांदरफळ, कुरण, घुलेवाडीसह तालुक्यातील सर्व गावांचा कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा त्यांनी घेतला.

यावेळी आमदार डॉ.सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, प्रांताधिकारी शशिकांत मंगळुरे, उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित, तहसीलदार अमोल निकम, पोलीस निरीक्षक अभय परमार, सुनील पाटील, पी.वाय.कादरी,

नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ.सचिन बांगर, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, अमृतवाहिनी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे आदी बैठकीत उपस्थित होते.

यावेळी बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर शहरातील हॉटस्पॉट तसेच धांदरफळ बु., कुरण, घुलेवाडी येथील परिस्थिती व प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला.

तसेच संगमनेर शहर व तालुक्यातील परिस्थितीचा आढावा घेत प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना केल्या. याप्रसंगी श्री.थोरात म्हणाले, कोरोना हा अदृश्य शत्रू आहे.

मागील दोन महिन्यांत लॉकडाऊनमुळे त्याची वाढ रोखण्यात यश आले आहे. मात्र आता नागरिकांनी शासनाने लागू केलेल्या नियमांसह स्वयंशिस्त पाळणे महत्त्वाचे आहे.

कोरोनाचा मुकाबला आपण सतर्क राहून करु या. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन प्रशासनाने काही कडक नियम केले आहेत. नागरिकांनी त्याचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करावे.

कोरोना संकटात महसूल, पोलीस, आरोग्य कर्मचाऱ्यांसह अनेक विभागांचे कर्मचारी व पदाधिकारी, स्वयंसेवक चांगले काम करत आहेत. या काळात तालुक्यातील नागरिकांनी सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करीत गरीब, रोजंदारीवरीलल मजूर व परप्रांतीय कामगार यांना मानवतेच्या भावनेतून चांगले सहकार्य केले आहे.

हे काम कौतुकास्पद आहे. आपण राज्यपातळीवर काम करताना मदत कक्षातून परप्रांतीय मजूर, गोरगरिब यांच्यासाठी सातत्याने काम करत असून दररोज जिल्हानिहाय मदतकार्याचा आढावा घेत आहे.

नागरिकांच्या मिळालेल्या सहकार्यातून अहमदनगर जिल्हा व संगमनेर तालुक्यातील परिस्थिती प्रशासनाच्या नियंत्रणात आहे.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वांनी स्वयंशिस्त पाळावी. धांदरफळ, कुरण, संगमनेर शहर व हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणातील नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

यावेळी प्रांताधिकारी शशिकांत मंगळुरे यांनी कोरोनाचे रुग्ण, तालुक्यातील क्वारंटाईन केलेल्या व्यक्ती, त्यांना दिलेल्या सुविधा यासोबत प्रशासनाने केलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती दिली.

तहसीलदार अमोल निकम यांनी परप्रांतीय मजूर व त्यांची सद्य परिस्थिती याबाबत माहिती दिली.

अहमदनगर लाईव्ह 24