अलिबाग, जि. रायगड, दि.17 (जिमाका) : म्हसळा नळ पाणीपुरवठा योजना ता.म्हसळा या योजनेस पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्याकडून तत्वत: मान्यता देण्यात आली होती.
या योजनेस कार्यान्वित करण्याकरिता खासदार सुनिल तटकरे यांनी अथक प्रयत्न केले होते. मात्र तत्कालीन ठेकेदाराच्या निष्क्रियतेमुळे ही योजना कार्यान्वित होऊ शकली नाही.
आता फेर ई-निविदा प्रक्रियेनुसार कामाचा ठेका शशांक आत्माराम सावंत-देसाई ता.चिपळूण, जि.रत्नागिरी यांना मिळाला आहे.
तरी म्हसळा नळ पाणीपुरवठा या योजनेचे काम तात्काळ सुरु करुन ते लवकरात लवकर पूर्ण करावे, असे आदेश पालकमंत्री आदिती तटकरे यांनी ठेकेदार शशांक आत्माराम सावंत-देसाई यांना म्हसळा पंचायत समिती येथे आयोजित बैठकीत दिले.
म्हसळा पंचायत समिती येथे पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली म्हसळा नळ पाणीपुरवठा योजनेबाबतची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी या बैठकीस नगराध्यक्ष जयश्री कापरे, जि.प.कृषी व पशुसंवर्धन सभापती बबनशेठ मनवे, सभापती उज्वला सावंत, उपसभापती मधुकर गायकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री आदिती तटकरे यांनी म्हसळा नळपाणी पुरवठा योजनेबाबतची पूर्ण माहिती घेऊन श्री.सावंत-देसाई यांना या योजनेचे काम तात्काळ सुरु करण्याची आदेश दिले तर उप अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा
श्री.गांगुर्डे, श्रीवर्धन उप अभियंता बांधकाम, श्री.कापुस्ते यांनी या सर्व कामावर नियंत्रण ठेवून हे काम लवकरात लवकर पूर्ण होईल यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, अशा सूचना दिल्या.
ठेकेदार श्री.सावंत-देसाई यांनी सद्य:स्थितीत लॉकडाऊनमुळे बरेचशे मजूर आपआपल्या गावी गेल्यामुळे पाईपचे उत्पादन बंद आहे.
त्यामुळे उर्ध्ववाहिनीचे काम सुरू करण्यासाठी डी.आय पाईपलाईन चा पुरवठा आठ ते पंधरा दिवसात उपलब्ध होणार असून त्यानंतर हे काम लवकरात लवकर पूर्ण केले जाईल,असे पालकमंत्री महोदयांना आश्वासन दिले.