मनरेगातून विकासकामांसह रोजगारनिर्मितीला चालना

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अमरावती, दि. 18 : लॉकडाऊनचा पार्श्वभूमीवर विविध भागात महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कामांना सुरुवात केली असून, वैयक्तिक लाभाच्या तसेच सामूहिक विकास कामांना प्राधान्य देण्यात आले आहे.

गत दोन आठवड्यात या मनुष्यबळ उपस्थितीत लक्षणीय वाढ झाली आहे. आजमितीला जिल्ह्यात 668 ग्रामपंचायतींमध्ये  तीन हजारांवर कामे सुरू असून, 67 हजार 27 मनुष्यबळ उपस्थिती आहे, असे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज येथे सांगितले.

कोरोना संकटकाळात लॉकडाऊन असताना ग्रामीण भागातील नागरिक रोजगारापासून वंचित राहू नयेत म्हणून मनरेगाच्या माध्यमातून अधिकाधिक कामांना चालना देण्याचे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी जिल्हा प्रशासनाला दिले होते.

त्यानुसार ही कामे व्यापकपणे राबविण्यात येत असून, मजूर उपस्थितीत लक्षणीय वाढ झाली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन सुरु झाल्यामुळे रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला असतानाच ग्रामीण भागात महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ‘मागेल त्याला काम’ उपलब्ध करून देण्यात येत आहे.

जिल्ह्यातील मेळघाटातील अतिदुर्गम परिसरात या कामांना प्राधान्य देण्यात आले असून, घरकुलासह विविध विकासकामांना चालना देण्यात आली आहे.

कामाची गरज ओळखून या कामांना तत्काळ प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी देण्यात आली. कामावर असलेल्या प्रत्येकाला 15 दिवसाच्या आत त्यांची मजुरी थेट बँक किंवा पोस्ट खात्यात जमा करण्यात येत आहे.

मजुरांची उपस्थिती सातत्याने वाढत असून त्याप्रमाणे विविध विकासकामांना गती देण्यात येत आहे, असे पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी सांगितले.

या कामांची माहिती ग्रामीण नागरिकांना व्हावी म्हणून गावागावात दवंडी देण्यात आली. कामांवर मास्क, सॅनिटायझरचा वापर करून व सोशल डिस्टन्सिंग ठेवून कामे करण्यात येत आहेत.

दि. 23 मार्च रोजी साडेसात मजूर उपस्थिती होती. ती आज 67 हजारांवर पोहोचली आहे. सुमारे 14 कोटी निधीचे वाटप मजुरीसाठी या माध्यमातून करण्यात आले.

ग्रामीण भागात उपजीविकेचा प्रश्न बिकट सोडविण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून वैयक्तिक तसेच सामूहिक स्वरुपाच्या कामांना प्रशासकीय व तांत्रिक मान्यता दिल्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर मोठ्या प्रमाणात कामे उपलब्ध होत आहेत.

या कामांतून मोठी रोजगारनिर्मिती होत आहे, अशी माहिती रोहयो उपजिल्हाधिकारी राम लंके यांनी दिली.

मनरेगाच्या माध्यमातून ‘मागेल त्याला काम’ देण्याचा संकल्प असल्यामुळे तात्काळ कामे सुरु करण्यात आली. मागेल त्याला रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या या योजनेमुळे रोजगाराचा प्रश्न मोठ्या प्रमाणात  सुटला आहे.

त्यामुळे कामासाठी कुठेही बाहेर जाण्याची आवश्यकता नाही. मेळघाटात अधिकाधिक रोजगारनिर्मितीला प्राधान्य देण्यात आले आहे.

आजमितीला चिखलदरा तालुक्यात सुमारे 33 हजार 883, तर धारणी तालुक्यात सुमारे 18 हजार 114 मजूर उपस्थिती आहे.

मनरेगाच्या माध्यमातून सुमारे तीन हजार विविध विकासकामांना चालना देण्यात आली असून, मजूर उपस्थिती वाढत आहे, असेही श्री.लंके यांनी सांगितले.

प्रत्येक तालुका स्तरावर मागणीनुसार कामांचे नियोजन करण्यात आले आहे. या कामामुळे गावांमध्ये अत्यावश्यक तसेच शेतीसाठी आवश्यक असलेल्या वैयक्तिक  कामांची निवड करणे सुलभ झाले आहे.

रोजगार हमीच्या कामांवर पूर्वी 206 रुपये मजुरीचा दर होता. परंतु 1 एप्रिलपासून या दरात वाढ करण्यात आली आहे.

प्रतिदिन 238 रुपये याप्रमाणे किमान मजूरी देण्यात येते. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलाचे बांधकामाला प्राधान्य देण्यात आले असून राज्यात मोठ्या प्रमाणावर बांधकाम पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांनी मनरेगाअंतर्गत कामांना सुरुवात करावी, असेही आवाहन करण्यात येत आहे.

अहमदनगर लाईव्ह 24