कोविडसंदर्भात राज्यात आतापर्यंत १ लाख १० हजार गुन्हे दाखल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

मुंबई दि.१८- राज्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भातील १ लाख १०  हजार गुन्ह्यांची नोंद झाली. तसेच पोलिसांवर  हल्ला होण्याच्या २४० घटना घडल्या.

त्यात ८१९ व्यक्तींना ताब्यात घेतले असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

राज्यात  लॉकडाऊनच्या म्हणजे दि.२२ मार्च ते १७ मे या कालावधीत  कलम १८८ नुसार  १ लाख १० हजार १४० गुन्हे नोंद झाले असून २० हजार ९११ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी ४ कोटी ४९ लाख ४९ हजार १०४ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

पोलीस विभागाचा  १०० नंबर हा सर्व जिल्ह्यात २४ तास कार्यरत असतो.  लॉकडाऊन च्या काळात  या १०० नंबरवर ९३ हजार ६०६ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली.

तसेच राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर क्वारंटाईन असा शिक्का आहे अशा ६८० व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले.

राज्यात एकूण ३ लाख ६६ हजार १४६ व्यक्ती क्वारंटाईन आहेत. अशी माहिती श्री. देशमुख यांनी दिली. तसेच अत्यावश्यक सेवेसाठी आतापर्यंत पोलीस विभागामार्फत ३ लाख ९७ हजार १३९ पास देण्यात आले आहेत.

या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १३१७ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले व ५९ हजार ३६३ वाहने जप्त करण्यात आली . तसेच परदेशी नागरिकांकडून  झालेले व्हिसा उल्लंघनाचे १५ गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत.

पोलिसांसाठी कोरोना विशेष कक्ष

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्दैवाने   मुंबईतील ७ पोलीस कर्मचारी व १ अधिकारी असे एकूण ८,पुणे १, व सोलापूर शहर १, नाशिक ग्रामीण १ अशा ११पोलिस वीरांना आपला जीव गमवावा लागला.

राज्यात १३१ पोलीस अधिकारी व ११४२ पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर उपचार  सुरू आहेत.

पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली  तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत.

राज्यात एकूण ३ हजार ७९८ रिलिफ कॅम्प आहेत. तर जवळपास ३ लाख ६५ हजार १७९ लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे.

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपले पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. याची सर्वांनी नोंद घ्यावी.

त्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी.  लॉक डाऊनच्या काळात सर्व नियमांचे पालन करून कोरोनाशी मुकाबला करण्यास सहकार्य करावे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग हा अपेक्षित आहे.

लॉकडाऊनमध्ये थोडीशी शिथिलता मिळाली असली म्हणजे लॉकडाऊन संपले असे नाही. उलट या काळात  सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. त्यामुळे सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24