महाराष्ट्राचं साहित्य, कला, सांस्कृतिकविश्व समृद्ध करणारं महान व्यक्तिमत्व हरपलं

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

मुंबई, दि. 18 :- ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, रंगकर्मी रत्नाकर मतकरी यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.

महाराष्ट्राचं सांस्कृतिक विश्व समृद्ध करणारं महान व्यक्तिमत्व हरपलं असून साहित्यिक, रंगभूमी, सांस्कृतिक क्षेत्रातलं रत्नाकर मतकरी यांचं योगदान चिरंतन राहील, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

रत्नाकर मतकरी यांना श्रद्धांजली वाहताना उपमुख्यमंत्री म्हणाले, रत्नाकर मतकरी यांच्या निधनाची बातमी धक्कादायक आहे. रत्नाकर मतकरी हे नाव महाराष्ट्राच्या घराघरात पोहचलेलं नाव आहे.

महाराष्ट्रातील आबालवृद्धांसाठी त्यांनी साहित्यनिर्मिती केली. कथा, गूढकथा, कादंबरी, एकांकिका, नाटकं अशा साहित्याच्या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी मुशाफिरी केली. रंगभूमीवर यशस्वी नाटककार, दिग्दर्शक म्हणूनही त्यांनी लोकप्रियता मिळवली.

साहित्य अकादमी, संगीत नाटक अकादमी पुरस्कारानं त्यांना गौरवण्यात आलं होतं. चित्रपट दिग्दर्शनाचा राष्ट्रीय पुरस्कारही त्यांना मिळाला होता.

अनेक मान, सन्मान, पुरस्कारांनी गौरविण्यात आलेल्या रत्नाकर मतकरी यांना मराठी साहित्य, कलारसिकांनीही नेहमीच भरभरुन प्रेम, आदर, सन्मान दिला.

त्यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या साहित्य, कला विश्वाची मोठी हानी झाली आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी शोकभावना व्यक्त केल्या.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24