जळगाव, (जिमाका) दि. 18 : कोरोना विषाणूचा संसर्ग सर्वत्र वाढत आहे. जळगाव जिल्ह्यातही कोरोनाचे 279 रुग्ण आढळून आले आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी येथील सामान्य रुग्णालयातून जिल्ह्यातील कोविड केअर सेंटरमधील डॉक्टर व रुग्णांशी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला व तेथील परिस्थितीची माहिती जाणून घेतली.
त्याचबरोबर या सेंटरमध्ये रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे मनोधैर्य वाढण्यासाठी ते करीत असलेल्या कामाबद्दल त्यांचे कौतुक तर केलेच त्याचबरोबर रुग्णांना लवकरच बरे होऊन बाहेर या. अशा सदिच्छाही व्यक्त केल्या.
जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आढळून येणाऱ्या रुग्णांवर तातडीने उपचार होण्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्यात 78 कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे.
जिल्ह्यात अमळनेर, चोपडा, पाचोरा, भडगाव, जळगाव व भुसवाळ येथे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. या रुग्णांवर त्याचठिकाणी उपचार करण्यात येत आहे.
या रुगणांशी व डॉक्टरांनी आज संवाद साधताना अमळनेर येथे आतापर्यंत 105 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. यापैकी आतापर्यंत 35 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे तर आज 30 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील रुग्णांवर वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून चांगल्याप्रकारचे व योग्य प्रकारे उपचार होत असल्याने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण बरे होत आहे याबद्दल पालकमंत्र्यांनी अमळनेरसह जिल्ह्यातील सर्व कोविड केअर सेंटरमधील वैद्यकीय अधिकारी व त्यांच्या टिमचे कौतुक केले.
तर कोरोना बाधित रुग्णांशी संवाद साधून त्यांना मिळत असलेल्या सुविधा, तसेच त्यांचेवर होणारे उपचार, सेंटरमधील स्टाफची रुग्णांशी वागणूक आदि बाबींची विचारपूस केली. त्याचबरोबर डॉक्टर चांगल्याप्रकार उपचार करीत असल्याने आपण या महामारीतून नक्कीच बरे होऊन लवकरच घरी परताल अशा सदिच्छाही दिल्या.
जळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता त्यावर उपाय म्हणून येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात राज्य शासनाने प्रयोगशाळा स्थापन करण्यास मंजूरी दिली आहे.
प्रयोगशाळेचे काम अंतिम टप्प्यात असून येथे लवकरच स्वॅबचे नमुने तपासण्यास सुरुवात होणार आहे. या कोरोना विषाणू संसर्ग तपासणी प्रयोगशाळेस पालकमंत्री श्री.पाटील यांनी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे,
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ एन. एस. चव्हाण, वैद्यकीय अधिक्षक डॉ.किरण पाटील यांचेसमवेत भेट देऊन पाहणी केली. प्रायोगिक तत्वावर याठिकाणी आजपासून नमुने तपासण्यास सुरुवात करण्यात आल्याची माहिती अधिष्ठाता डॉ.खैरे यांनी दिली तर लवकरच जिल्ह्यातील सर्व रुग्णांचे नमुने याच प्रयोगशाळेत तपासण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
येथील कोविड रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोना बाधित महिलेची दोन दिवसांपूर्वी प्रसुती झाली असून या महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे.
या दोन्ही बाळांची तब्बेत ठणठणीत आहे. आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कोविड रुग्णालयास भेट देऊन दिली त्यावेळी पालकमंत्र्यांनी या महिलेसाठी तिच्या नातेवाईकांकडे साडीचोळीचा आहेर देऊन आपले भावाचे कर्तव्य पार पाडले व लवकरच बरे होण्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
त्याचबरोबर येथील रुग्णांना पोषक आहारही पालकमंत्र्यांच्यावतीने वाटप करण्यात आला.