निष्क्रीय असल्यामुळेच त्यांनी रणांगण सोडले : पाचपुते

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

श्रीगोंदा : केवळ भाजपमध्येच विकास करण्याची ताकद आहे. माझ्या राजकीय जीवनात काम करत असताना सर्वसामान्य शेतकरी हाच केंद्र बिंदू मानून काम केले. पण मागील पाच वर्षात चुकीच्या नियोजनामुळे शेतकऱ्यांच्या फळबागा डोळ्यादेखत जळताना पाहून वाईट वाटते. घोड, कुकडी, विसापूर, साकळाई,सीना,या महत्वाच्या शेतकऱ्यांशी निगडित असणाऱ्या प्रश्नाला विद्यमान लोकप्रतिनिधीने कधीच महत्व दिले नाही.

ते तालुक्याचे आमदार होते की एका गावाचे होते हेच त्यांना समजले नाही. निष्क्रीय असल्यामुळेच त्यांनी रणांगण सोडले, अशी खरमरीत टिका महायुतीचे उमेदवार बबनराव पाचपुते यांनी आ. राहुल जगताप यांच्यावर केली. बेलवंडी येथे प्रचार सभेत ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, कुकडीच्या बैठकीत या महाशयांनी कधीच तोंड उघडले नाही, पण बाहेर आले की, पेपरबाजी करण्यात पटाईत राहिले. पण माझ्या शेतकऱ्यांचे प्रपंच उघड्यावर पडले याला जबाबदार कोण, याचा जनता जाब विचारणार म्हणून मैदान सोडून पळाले व सांगतात मी कुकडीच्या हितासाठी निवडणूक लढवत नाही.

पण तुमचे पाच वर्षातील काम जनतेसमोर सांगायला तुम्हाला तोंड नव्हते म्हणूनच निवडणुकीतून माघार घेतली आहे व ज्याने गेल्या वर्षभरापूर्वी व त्यापूर्वी ही जगताप यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांचे सारथ्य करत आहेत.

पण ज्याचे जळते त्याला कळते म्हणून जनता आता हुशार आहे. स्वत:चे वाटोळे करून घेणार नाहीत व पाण्याच्या प्रश्नावर जनता माझ्याबरोबर आहे व मी हि निवडणूक फक्त जनतेच्या विकासाच्या व पाणी प्रश्नावर लढवत आहे.

या तालुक्याचे वाटोळे होऊ देणार नाही याची हमी देतो. श्रीगोंदा मतदार संघाचा विकास करण्याची ताकद फक्त भाजप मध्येच आहे . ५ वर्ष आमदार नसतानाही तालुक्याच्या विविध कामात मुख्यमंर्त्यांनी भरीव मदत केली. 

अहमदनगर लाईव्ह 24