पाथर्डी: राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे अनेक घटकांना त्याचा फटका बसला. नोकर भरतीचे आमिष दाखवून प्रत्यक्षात एकाही विभागाची नोकर भरती गेल्या पाच वर्षात झालेली नाही. ज्यांनी स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करून सरकारी नोकरी मिळण्याची अपेक्षा बाळगली त्यांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली.
पवित्र पोर्टल, ऑनलाईन अर्ज, मेगाभरती या संदर्भात आतापर्यंत फक्त आश्वासनांच्या पलिकडे काहीच मिळाले नाही. पाथर्डी व शेवगाव तालुक्यात स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वात जास्त आहे.
यापूर्वी या परिक्षांच्या माध्यमातून हजारो तरुणांना शासकीय नोकरीचा लाभ मिळाला परंतु भाजप सरकारच्या काळात विद्यार्थ्यांचे भवितव्यच टांगणीला लागले असून ३५ हजार पोलिसांची भरती करण्याची वल्गना करणाऱ्या सरकारने प्रत्यक्षात केवळ तीन हजार पोलिसांची नव्याने भरती केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अँड.प्रतापराव ढाकणे यांनी केला.
शहर व तालुक्यातील स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करणाऱ्या तरूणांनी आज सकाळी श्री. ढाकणे यांची भेट घेवून त्यांना पाठिंबा दिला. संस्कार भवन येथे झालेल्या बैठकीत या तरूणांनी भाजप सरकारच्या युवकांच्या बेरोजगारी व नोकरी भरतीच्या धोरणांवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. शेकडो तरुणांनी यावेळी बोलताना आपल्या भवितव्याची चिंता व्यक्त करत ढाकणे यांच्यासारखे नेतृत्व विधानसभेत असल्यास आपली बाजू मांडून न्याय मिळवून देतील अशी आशा व्यक्त केली.
यावेळी या तरुणांशी संवाद साधताना ॲड. ढाकणे म्हणाले, राज्य शासनाने विविध नोकरभरतीसाठी ऑनलाईन परिक्षा महापोर्टलब्दारे घेण्यात आल्या. यामध्ये अनेक त्रुटी व गैरव्यवहार असल्याचे समोर आले. त्यामुळे या पध्दतीवर युवकांचा रोष आहे. तालुका दुष्काळी असला तरी आपल्याकडे होतकरू, जिद्दी व शिक्षणाच्या माध्यमातून स्वावलंबी परंपरा असून अशी हजारो उदाहरणे आज आहेत.
यशस्वी जीवनाचा मुलमंत्र शिक्षणात असल्याने स्वत:च्या हिमतीवर अनेकांनी आपले जीवन घडविले. मात्र आज भाजप सरकारच्या चुकीच्या व मनमानी कारभारामुळे सुशिक्षीत युवक व युवतींच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोणत्याच विभागाची नोकर भरती करण्यात आलेली नाही. पोलिस भरतीच्या नावाखाली लाखो तरूणांना घाम गाळायला लावणाऱ्यांनी त्यांच्याही तोंडाला पाने पुसली.