परिस्थिती नियंत्रणात तरीही सतर्कता आवश्यक : कृषी मंत्री दादाजी भुसे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

मालेगाव, दि. १९ : ‘कोरोना’ विषाणूच्या प्रतिबंधासाठी मालेगाव शहरात राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांना बऱ्यापैकी यश मिळत आहे.

केंद्र शासनाच्या सुधारित मार्गदर्शक सुचनांनुसार रुग्ण मोठ्या संख्येने घरी जात आहेत. यामुळे रुग्णांना दिलासा मिळाला आहे.

यापुढेही मनपा प्रशासनाने पुढच्या टप्प्यासाठी तयार राहावे व संभाव्य रुग्ण शोधणेची प्रक्रिया निरंतर सुरू ठेवावी. अशा सुचना राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी आज दिल्या.

अपर जिल्हाधिकारी कार्यालयात खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांना पीपीई किट वाटपाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरचे प्रमुख डॉ.पंकज आशिया,

प्रशिक्षणार्थी (भाप्रसे) शुभम गुप्ता, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिक्षक सुनिल कडासने, अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा,

महानगरपालिकेचे उपायुक्त नितीन कापडणीस, तहसिलदार चंद्रजित राजपूत, पोलिस निरीक्षक प्रभाकर निकम, डॉ.निखील सैंदाणे, डॉ.हितेश महाले आदी उपस्थित होते.

कोरोनाची प्रायमरी स्टेजमधील लक्षणे दर्शविणारे एक्स-रे मशीनमुळे आरोग्य प्रशासनाला मोठी सोय उपलब्ध झाल्याचे सांगत मंत्री श्री.भुसे म्हणाले,

प्रशासनामार्फत चांगल्या प्रकारे राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांमुळे नागरिकांचा प्रतिसाद वाढला आहे. मालेगावातून कोरोना हद्दपार करण्यासाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहनही मंत्री श्री.भुसे यांनी केले आहे.

कंटेंटमेंट क्षेत्रांचा फेरआढावा : जिल्हाधिकारी मांढरे

शहरात 119 प्रतिबंधीत क्षेत्र (कन्टेंमेंट झोन) आहेत. त्याचा फेरआढावा घेवून त्यात योग्य दुरूस्त्या कराव्यात. डिसीएचसी रुग्णालयात ऑस्किजन पाईपलाईन तात्काळ कार्यान्वित करावी.

रुग्णालयातील डॉक्टरांचा व्हॉट्सअप लोकेशनसह उपस्थिती अहवाल नोंदवावा. अनुपस्थित डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई करावी. सामान्य रुग्णालयातील रिक्त पदे तातडीने भरण्यात यावी.

रुग्णालयात बेड व्यवस्था करतांना सुरक्षीत अंतर ठेवावे. अशा सुचना जिल्हाधिकारी श्री.मांढरे उपस्थितांना दिल्या. तसेच जे नागरिक रोजगारापासून वंचित आहेत अशा आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांसाठी धान्यवाटपाची योजना तयार करण्याबाबतचे निर्देशही जिल्हाधिकारी श्री.मांढरे यांनी यावेळी दिले.

वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिकांशी संवाद

शहरातील मुळचे रहिवासी असलेल्या वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिकांशी आज राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे व जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी संवाद साधला,

यावेळी शहरातील नागरिकांच्या समस्या, त्यांना मिळणाऱ्या वैद्यकीय सुविधांसह धान्य वाटपाबाबत सकारात्मक चर्चा झाली. यावेळी मंत्री श्री.भुसे यांनी त्यांच्या शंकाचे निरसन केले.

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार व मार्गदर्शक सुचनांप्रमाणे प्रशासन काम करित असल्याचे सांगत, मालेगाव तालुका लवकरच कोरोनामुक्त होईल असा विश्वासही मंत्री श्री.भुसे यांनी व्यक्त केला.

तर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी त्यांना वैद्यकीय सेवा देण्याचे आवाहन करत नागरिकांमधील गैरसमज दुर करून उपचारासोबत काळजी घेणे देखील महत्वाचे असल्याचे नागरिकांमध्ये प्रबोधन करण्याबाबत आवाहन केले.

अहमदनगर लाईव्ह 24