सिंधुदुर्गनगरी, दि. 19 – पडवे येथील वैद्यकीय महाविद्यालयामध्ये कोविड तपासणी प्रयोगशाळा सुरू करता येईल का याविषयी जिल्हा शल्य चिकित्सक यांनी चाचपणी करावी असे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिल्या.
तसेच याबाबतचा स्पष्ट लेखी अहवाल दोन दिवसात सादर करावा अशा सूचनाही त्यांनी दिल्या. पालकमंत्री श्री. सामंत यांनी आज जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रयोगशाळेस भेट दिली व आलेल्या मशिन्सची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांच्यासोबत जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, पायथॉलॉजिस्ट श्री. लोखंड, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, संदेश पारकर, संजय पडते आदी उपस्थित होते.
सध्या जिल्ह्यात जी प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ती माकडतापासाठीची प्रयोगशाळा असणार असल्याचे सांगून पालकमंत्री पुढे म्हणाले की, माकडतापाची लॅब व कोवीड ची लॅब यामध्ये मोठा फरक आहे.
कोवीड लॅबसाठी लागणारी यंत्रसामुग्रीही मोठी व जास्त आहे. सध्या जिल्ह्यामध्ये त्यासाठीची यंत्रसामग्री उपलब्ध नाही. तसेच जी काही यंत्रसामग्री आली आहे ती माकडतापाच्या लॅबसाठीची आहे.
तसेच या लॅबसाठीचीही काही यंत्रसामग्री जिल्ह्याला प्राप्त झालेली नाही. तसेच यासाठी एम.डी. मायक्रोबायोलॉजिस्ट हे महत्वाचे पद असते.
ते जिल्ह्यात उपलब्ध नाही. तसेच कोवीडची लॅब सुरू करण्यासाठी असणारी प्रक्रियाही मोठी असल्याचे पालकमंत्री श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.
यावेळी पालकमंत्री श्री. सामंत यांनी प्रयोगशाळेत सध्या उपलब्ध असलेल्या यंत्रसामग्रीची माहिती घेतली. तसेच माकडतापाची प्रयोगशाळा व कोवीडची प्रयोगशाळा यामध्ये नेमका किती व कोणता फरक असतो याची माहिती घेतली.
कोवीडची प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी नेमक्या कोणत्या अडचणी आहेत. जिल्ह्यात प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी कशा प्रकारे कार्यवाही करावी लागेल याविषयीची सविस्तर चर्चा केली.