अपघातग्रस्त रुग्णांची पालकमंत्र्यांकडून विचारपूस

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

यवतमाळ, दि.१९ : आर्णी तालुक्यातील कोळवण येथे आज (दि.19) पहाटे साधरणत: 3.30 ते 4 वाजताच्या दरम्यान बस आणि टिप्परचा अपघात झाला.

यात चार जण ठार तर 28 जण जखमी झाले. जखमींना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भरती करण्यात आले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी वैद्यकीय महाविद्यालयात जाऊन अपघातग्रस्त रुग्णांनी भेट घेतली.

तुम्ही कुठे राहता, सोलापूरला कामाकर‍िता केव्हा गेले होते. तुमचा परिवार कुठे राहतो, आदी बाबींची पालकमंत्र्यांनी अतिशय आस्थेने विचारपूस केली. तसेच सर्वांना येथून बरे करूनच पाठवू. तुम्ही चिंता करू नका.

येथील प्रशासन तुमची काळजी घेईल. तसेच बरे झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या राज्यात रेल्वेने पाठविण्यात येईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी किरकोळ जखमींना भरती केलेल्या वॉर्डात तसेच गंभीर जखमी असलेल्या अतिदक्षता वॉर्डात जाऊन अपघातग्रस्त रुग्णांची पाहणी केली.

याप्रसंगी जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, जिल्हा पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आर.पी.सिंह, विभागप्रमुख डॉ. मिलिंद कांबळे, उपविभागीय पोलिस अधिकारी माधुरी बावीस्कर आदी उपस्थित होते.

आर्णी जवळ बस आणि टिप्परचा अपघात : सोलापूरवरून नागपूर येथे स्थलांतरीत मजुरांना घेऊन जाणारी बस, टिप्परला धडकल्याने झालेल्या अपघातात चार जण ठार झाले. मृतकांमध्ये सोलापूर येथील बस चालकाचासह दोन महिला छत्तीसगड आणि एक जण झारखंड येथील आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील आर्णि तालुक्यात कोळवण येथे आज (दि.19) पहाटे साधरणत: 3.30 ते 4 वाजताच्या दरम्यान हा अपघात झाला. या बसमध्ये दोन चालक व 30 प्रवासी असे एकूण 32 जण होते.

यात झारखंडचे 19 जण, छत्तीसगडचे 8 आणि मध्यप्रदेशच्या 3 जणांचा समावेश होता. अपघातात सहा जण गंभीर जखमी झाले असून 22 जण किरकोळ जखमी आहेत.

सर्व जखमींना यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भरती करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

मृत झालेल्या व्यक्तिंचा मृतदेह रुग्णवाहिकेने पाठविण्याची व्यवस्था जिल्हा प्रशासनाने केली असून जखमींची पूर्ण काळजी, त्यांचा औषधोपचाराकरीता जिल्हा प्रशासन मदत करणार आहे.

जखमी नागरिक बरे झाल्यानंतर त्यांना आपापल्या जिल्ह्यात सोडण्याची व्यवस्था सुध्दा प्रशासनाकडून करण्यात येईल, जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी कळविले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24