अमरावती, दि. १९ : अमरावती विभागातील विविध जिल्ह्यांत अडकलेल्या बिहारमधील ५६८ कामगार बांधवांना स्वगृही पोहोचविण्यासाठी विशेष श्रमिक एक्प्रेस आज दुपारी चारला अमरावती रेल्वे स्थानकावरून बिहारमधील बरौनीकडे रवाना झाली.
अमरावती विभागात अडकलेल्या कामगार बांधवांना स्वगृही सोडण्यासाठी ही विशेष श्रमिक एक्स्प्रेस विनाथांबा बरौनीपर्यंत जाणार आहे. ही एक्स्प्रेस 24 डब्यांची असून, त्यात अमरावती विभागातील ५६८ व नागपूर रेल्वेस्थानकावरून नागपूर विभागातील सुमारे ७०० कामगार बांधव रवाना होत आहेत.
जिल्हाधिकारी शैलेश नवाल, उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत यांच्यासह महसूल, रेल्वे, पोलीस प्रशासनाचे अनेक अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
रेल्वेस्थानकावर प्रथमत: सर्व प्रवासी नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यांच्या भोजन, चहा, पाणी व इतर व्यवस्था यावेली करण्यात आली. त्यासाठी नानकरोटी उपक्रमाचे सहकार्य मिळाले. विभागातून ठिकठिकाणाहून आलेल्या प्रवाश्यांच्या चेह-यावर घरी परतण्याचा आनंद दिसत होता.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. नवाल व विविध अधिका-यांनी प्रवाश्यांशी संवाद साधून त्यांना सोशल डिस्टन्स, मास्कचा वापर आदींबाबत आवाहन केले व प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
संचारबंदीमुळे अनेक दिवसांपासून अडकून पडल्यामुळे कुटुंबियांशी केवळ फोनद्वारे संपर्क होत होता. मात्र, शासनाने आमची दखल घेऊन विशेष ट्रेनची व्यवस्था केली.
त्यामुळे आम्हाला आमच्या कुटुंबियांना, नातेवाईकांना अनेक दिवसांनी प्रत्यक्ष भेटता येणार आहे. अनेक दिवसांनी घरी परतण्याचा आनंद मोठा आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी अनेकांनी व्यक्त केली.