मुंबई, दि. १९ : सध्या कोरोनामुक्त झालेल्या ग्रीन झोनमध्ये पूर्ण क्षमतेने उद्योग सुरू झाले आहेत. आतापर्यंत ७० हजार परवाने दिले असून त्यापैकी ५२ हजारांहून अधिक कारखाने सुरू झाले आहेत.
यात साडेबारा लाख कामगार रुजू झाले आहेत. याशिवाय रेड झोनमधील अत्यावश्यक सेवा, निर्यात प्रधान उद्योग, संरक्षण दलासाठी लागणारे साहित्य- सामुग्री, सुटे भाग निर्मिती करणारे कारखाने, सिप्झ, डायमंड आदी क्षेत्रातील उद्योगांनाही उत्पादनासाठी परवानगी दिलेली आहे.
परंतू रेड झोनमधील इतर उद्योगांवरील निर्बंध कायम ठेवले जाणार आहेत. एकूणच महाराष्ट्र राज्य औद्योगिकदृष्ट्या सावरतोय. अशा परिस्थितीत सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे केले.
वॉटर बॉटल असोशिएनच्यावतीने आयोजित वेबिनारमध्ये श्री.देसाई बोलत होते. यावेळी संघटनेचे राज्यभरातील पदाधिकारी सहभागी उपस्थित होते.
केंद्र शासनाने जाहीर केलेल्या पॅकेजमधून लघु, मध्यम उद्योगांना विनातारण कर्ज, पीएफमध्ये दिलासा देण्यात आला आहे. या पॅकेजचा लघु उद्योजकांन लाभ घ्यावा.
राज्य सरकार देखील लघु उद्योगांना सवलती देत आहे. विजेचे स्थिरदर रद्द करून जेवढा वापर होईल तेवढे दर आकारले जात आहेत. वॉटर बॉटल संघटनने देखील केंद्राच्या या पॅकेजचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री.देसाई यांनी केले.
पाणी उद्योगांचा दर्जा टिकवून वॉटर बॉटल संघटनेने आपली प्रतिमा अधिक शुद्ध व तेजस्वी करावी. केवळ पाणी उद्योगावर विसंबून न राहता इतर जोड उद्योग सुरू करावेत, असे आवाहन श्री.देसाई यांनी केले.